बांगलादेशात शेख हसिना यांचे सरकार प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेवर

विरोधकांनी फेटाळले निकाल; फेर निवडणुकीची केली मागणी

ढाका: बांगलादेशात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी पुर्ण झाली असून तेथे शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पुन्हा सत्ता मिळाली आहे. शेख हसिना यांच्या नेतृृत्वाखालील सरकारला 300 पैकी तब्बल 288 जागा मिळाल्या असून विरोधी पक्षांना केवळ बारा जागांवर समाधान मानावे लागले आहे. शेख हसिना यांनी एकतर्फी पद्धतीने प्रचंड बहुमत मिळवून तेथील जनतेवरील आपली हुकुमत पुन्हा सिद्ध केली आहे. बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने अधिकृतपणे आज सोमवारी हे निकाल जाहीर केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बांगलादेश नॅशनल पार्टी ही त्या देशातील प्रमुख विरोधी पार्टी आहे. या पार्टीने अन्य पक्षांशी आघाडी करून जातीय ओईक्‍य फ्रंट म्हणजेच नॅशनल युनिटी फ्रंट ही आघाडी स्थापन केली होती त्यांना केवळ सात जागा मिळाल्या असून त्यांचा साफ धुव्वा उडाला आहे. अन्य पक्षांना केवळ तीन जागा मिळाल्या. एका मतदार संघातील उमेदवाराच्या निधनामुळे तेथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

नॅशनल युनिटी फ्रंट या विरोधकांच्या आघाडीने हे निकाल फेटाळून लावले आहेत. सत्तारूढ पक्षाने गैरप्रकार करून ही निवडणूक जिंकली असल्याचा दावा या आघाडीने केला असून त्यांनी देशात वेगळे त्रयस्थ सरकार नेमून पुन्हा निवडणूका घ्याव्यात अशी मागणी केली आहे. या आघाडीचे प्रमुख कमाल हुसेन यांनी म्हटले आहे की बांगलादेशात झालेल्या या निवडणुका म्हणजे केवळ एक फार्स होता. जवळपास सर्वच मतदार संघात फ्रॉड झाला असून या निवडणुका खोटेपणाने त्यांनी जिंकल्या आहेत असा आरोप त्यांनी केला.

हा निकाल म्हणजे एक क्रुर विनोद आहे अशी प्रतिक्रीया बांगलादेश नॅशनल पार्टीचे सरचिटणीस जनरल मिर्झा फकरूल इस्लाम आलमगीर यांनी दिली आहे. या पक्षाच्या नेत्या बेगम खालिदा झिया या सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कारागृहात आहेत. या निवडणुकीवर आम्ही याही वेळेला बहिष्कारच घालायला हवा होता. मागच्यावेळी आम्ही घातलेला बहिष्कार योग्यच होता असे त्यांनी म्हटले आहे.

बांगलादेशात झालेली एकूण 11 वी सार्वत्रिक निवडणूक होती व यात सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येणाऱ्या शेख हसिना या देशातील पहिल्या नेत्या ठरल्या आहेत. पंतप्रधानपदावर विराजमान व्हायची त्यांची एकूणातील ही चौथी वेळ आहे.दरम्यान निवडणूक आयोगाचे सचिव अहमद यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. निष्पक्ष आणि पारदर्शी वातावरणात या निवडणूका पार पडल्या आहेत असा दावा त्यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)