ती आणि तीच

मला भावलेला चित्रपट “आनंदी गोपाळ’ बघताना डोळ्यातले अश्रू खरं तर थांबत नव्हते. तो चित्रपट बघताना एक गोष्ट विशेष मनाला भावली. ती म्हणजे, सुरवातीला ‘तुम्ही सोडून तर जाणार नाही ना?’ ह्या भीतीने ती शिकते अन शेवट “तू आहेस ना?’ हा आधार त्याला तिचा वाटतो. फार सुंदर हे दोन शब्द मला भावले. त्यातूनच वाटले, “ती आणि ती’ चा विचार आला. अगदी उपनिषदांच्या आधाराचा उल्लेख केला, तर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. पण ती निर्मिती करण्याची प्रथम इच्छाच निर्माण झाली, अन सृष्टीची निर्मिती झाली.

म्हणजे ब्रह्मांडाचा मूळ आधार घेतला, तर ती इच्छाच निर्मितीला कारणीभूत ठरली असावी. ती इच्छा ती निर्मिती या मुख्य बिंदूतून निर्माण झाली ती सृष्टी. त्यातीलच पुन्हा एक जीव “ती’. या “ती’ चे अनन्यसाधरण महत्व आपल्या आयुष्यात आहे. ती जननी, तीच सखी, तीच प्रिया, तीच असूया, तीच मोहिनी. “ती’ आणि केवळ “ती’च आयुष्य फुलवते, रुजवते, बहरवते अन “ती’ आणि “ती”च कधी सजीव, तर कधी निर्जीव रूपात आपले आयुष्य व्यापून टाकते.

सहजच विचार आला, तो दरवाजा पण “ती’ खिडकी, “ती’ भिंत. कारण नुसता दरवाजा असून चालणार नाही, तर त्याला खरा आधार देते “ती’ भिंत, तर प्रकाशाला वाट करून देते “ती’ खिडकी तेवढीच महत्त्वाची आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टी डोळ्यासमोरून गेल्या, तर फक्त “ती’ चे अस्तित्वच जास्त प्रभाव टाकून जाते. “ती’ शिवाय आयुष्याचा हा प्रवास अपूर्णच. अगदी शेवटच्या क्षणाच्या यात्रेसाठी वापरली जाते “ती’ तिरडी. जन्मापासून अंतापर्यंत “ती’ आणि “ती’च व्यापून टाकते. आणि ह्याच संकल्पनेचे मूर्त स्वरूप म्हणून “स्त्री’ चे भावविश्‍व नकळत जाणीव करून देते, तिच्या असण्याने परिपूर्णता येते.

निवडप्रक्रियेचा विचार केला, तर आपण आपल्या आयुष्याच्या तीन अंकी नाटकात प्रत्येक टप्प्यात “ती’चाच विचार प्रथम करतो. “ती’ आवड, “ती’ इच्छा आणि मग “ती’ निवड. मग “ती’ मैत्रीण असो, “ती’ पत्नी असो. तिला आहे काही पर्याय? मग तिचा असा विचार केला तर “ती’च्याशिवाय माझे अस्तित्वच शून्य ठरेल अन नकळत त्या “ती’ चे आपल्या आयुष्यातील स्थान मिळेल अन पुन्हा तिलाच प्रतिष्ठाही मिळेल. “ती’ स्वाभिमानाने तिचे “स्त्री’ हे बिरुद मिरवू शकेल. “ती’ आणि “ती’ चे अस्तित्व अगदी इच्छा ते अंत्ययात्रा हा निर्मितीचा प्रवास केवळ तिच्यामुळेच…! अशा “ती’ चे अस्तिव आपल्या दैनंदिन शब्दोच्चारातही आपल्याला जाणवत राहते तेव्हा अशा “ती’ आणि “ती’च्या जगाला फुलवूया…!

– मधुरा धायगुडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)