निवडक खरेदीमुळे मुख्य निर्देशांकांत दोन दिवसांनंतर वाढ

-आयसीआयसीआय बॅंकेचे शेअर कोसळले

-चंदा कोचर यांच्यावर सीबीआयने कारवाई केल्याचा परिणाम

मुंबई  – सीबीआयने आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्या विरोधात कथित अनियमित कामाबाबत कारवाई सुरू केल्यामुळे आयसीआयसीआय बॅंकेचे शेअर आज 3 टक्‍क्‍यांपर्यंत कोसळले. बाजार बंद होताना त्यात थोडीशी सुधारणा झाली. मात्र तरीही कालच्या तुलनेत या बॅंकेचे शेअर 0.72 टक्‍क्‍यांनी कोसळले. त्याचबरोबर व्हीडीओकॉन कंपनीविरोधात कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअरही 2.73 टक्‍क्‍यांनी कोसळून या कंपनीच्या शेअरचे भाव केवळ 2.85 रुपयांवर आला. सीबीआयने कालपासून धाडसत्र सुरू केले होते.

दरम्यान एकूण शेअरबाजारात आज थोडी फार निवडक खरेदी होऊन निर्देशांकांत वाढ झाली. गेल्या दोन दिवसापासून निर्देशांक कमी होत होते. त्यात आज खंड पडला. यस बॅंकेच्या नव्या व्यवस्थापकीय संचालकाची निवड झाली आहे. त्यामुळे त्या बॅंकेचे शेअर आज वधारले. त्याचबरोबर चांगले ताळेबंद जाहीर केलेल्या काही कंपन्याच्या शेअरची आज बरीच खरेदी झाल्यामुळे निर्देशांकांना काही प्रमाणात आधार मिळाल्याचे वातावरण शेअर बाजारात होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 0.24 टक्‍क्‍यांनी म्हणजे 86 अंकांनी वाढून 36195 अंकावर बंद झाला तर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 18 अंकांनी वाढून 10849 अंकांवर बंद झाला. गेल्या दोन दिवसांत झालेल्या मोठ्या विक्रीमुळे सेन्सेक्‍स 470 अंकांनी कमी झाला होता.

आजच्या व्यवहाराबाबत बोलतांना एम्के मालमत्ता व्यवस्थापन संस्थेचे संशोधन प्रमुख जोसेफ थॉमस यांनी सांगितले की, परदेशातून नकारात्मक संदेश येणे चालूच आहे. मात्र भारताची परिस्थिती ठिक असली तरी निर्देशांक अगोदरच उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. त्यातल्या त्यात कंपन्यांच्या ताळेबंदांच्या आधारावर निर्देशांकात थोडीफार हालचाल होत आहे. त्याचबरोबर निवडणुका होणार असल्यामुळे राजकीय परिस्थिती गुंतागुंतीची होत असल्यामुळे गुंतवणूकदार तिकडे बारीक लक्ष देणे साहजिक असल्याचे त्यांनी सांगितले.

माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचा आज जास्त ओढा होता. सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेदरम्यान भांडवल सुलभता वाढविण्याबाबत बोलणी चालू असल्यामुळे बॅंकेचे शेअर गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. त्याचबरोबर काही बॅंकांवरील निर्बंध नजीकच्या काळात कमी होण्याची शक्‍यता आहे.

मुख्य निर्देशांकांत निवडक खरेदीमुळे काही प्रमाणात वाढ झाली असली तरी तशा खरेदीचा आधार छोट्या कंपन्यांना मिळाला नाही त्यामुळे स्मॉल कॅप आणि मिडकॅप 0.59 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले. गेल्या काही आठवड्यापासून मिड कॅप आणि स्मॉल कॅप मुख्य निर्देशांकाच्या तुलनेत पिछाडीवर आहेत.

रुपयाचे मूल्य काही प्रमाणात अस्थिर झाल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 96 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली त्याचबरोबर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 70 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)