शेअरबाजार निर्देशांक कोसळले

गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.67 लाख कोटींचे नुकसान

मुंबई  -देशातील आणि परदेशतील संस्थागत गुंतवणूकदार खरेदी करीत असल्याचे वातावरण कायम आहे. मात्र, जागतिक बाजारातून सकाळी नकारात्मक संदेश आल्यानंतर मोठ्या प्रमाणात नफेखारी होऊन शेअरबाजार निर्देशांक शुक्रवारी मोठ्या प्रमाणात कोसळले. टाटा मोटर्सला मोठा तोटा झाल्यामुळे या कंपनीचे शेअर कोसळल्यामुळे मुख्य निर्देशांकाना आधार मिळाला नाही. आज झालेल्या विक्रीचा फटका वाहन आणि धातू कंपन्याना मोठ्या प्रमाणात बसला.

ग्राहक वस्तू, बॅंका आणि औषधी कंपन्यांच्या शेअरचीही आज मोठ्या प्रमाणात विक्री झाली. फक्‍त रिऍल्टी क्षेत्राचा निर्देशांक काही प्रमाणात वाढला. काल झालेल्या व्यवहारानुसार परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 418 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 294 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. तरीही काल निर्देशांक वाढले नव्हते. याचा अर्थ किरकोळ गुंतवणूकदार नफेखोरीत पुढे असल्याचे दिसून येत आहे.

शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 424 अंकांनी म्हणजे 1.15 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 36546 अंकावर बंद झाला. तर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी तब्बल 125 अंकानी कमी होऊन 10943 अंकावर बंद झाला. मोठ्या कंपन्यांबरोबरच छोट्या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे आज मिडकॅप व लार्ज कॅप कमी झाले.

गेल्या आठवड्यांत अमेरीका आणि चीनचे व्यापारातील मतभेद कमी होत असल्याचे वातावरण होते. त्याचबरोबर भारतात चांगला अर्थसंकल्प जाहीर झाला. रिझर्व्ह बॅंकेनेही व्याजदरात कपात केल्यामुळे शेअर बाजारातील वातावरण चांगले होते. मात्र, आज झालेल्या विक्रीमुळे या आठवड्यात सेन्सेक्‍स केवळ 77 अंकानी तर निफ्टी 49 अंकानी वाढला. आज झालेल्या तुफान विक्रीमुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात तब्बल 6.67 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

डिसेंबर अखेरच्यात तिमाहीत टाटा मोटर्सला 26 हजार 993 कोटींचा तोटा झाला आहे. या आधीच्या तिमाहीत 1077 कोटींचा फायदा कंपनीला झाला होता. या कारणामुळे आज या कंपनीच्या शेअरचे भाव तब्बल 18 टक्‍क्‍यांनी कोसळले. आज एकाचा दिवसात या कंपनीचे भांडवली मुल्य 9123 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कंपनीला तोटा होत आहे.

टाटा मोटर्सने या तोट्याची कारणं देताना चीनमध्ये विक्रीला लागलेली खिळ, वाढते कर्ज आणि वाढलेला उत्पादन खर्च अशी कारणं दिली आहेत. जॅग्वॉर लॅंडरोव्हरच्या टाटा मोटर्सच्या महसुलात सुमारे 72 टक्के वाटा आहे. 2018 मध्ये मात्र या कार्सच्या विक्रीचा आलेख मंदावला. या सगळ्या कारणांमुळेच टाटा मोटर्सला मोठे नुकसान झाले, असे कंपनीने म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)