शारापोव्हाची विजयी सलामी, कॉर्नेटचा कर्बरला धक्‍का 

मॉंट्रियल डब्लूटीए महिला टेनिस स्पर्धा 
मॉंट्रियल: उत्तेजक सेवनाच्या आरोपावरून बंदीची शिक्षा भोगून परतलेली मारिया शारापोव्हा त्यानंतर पहिल्या विजेतेपदासाठी अद्यापही धडपडत आहे. रशियाच्याच दारिया कासत्किनाचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवून मॉंट्रियल महिला टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देताना शारापोव्हाने आणखी एका स्पर्धेत विजेतेपदाच्या मोहिमेला प्रारंभ केला. परंतु विम्बल्डन विजेत्या अँजेलिक कर्बरला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्‍का बसला.
मारिया शारापोव्हाने पहिल्या फेरीच्या सामन्यात 12व्या मानांकित दारिया कासत्किनाचे आव्हान 6-0, 6-2 असे मोडून काढताना दिमाखात दुसरी फेरी गाठली. केवळ 66 मिनिटे चाललेल्या या लढतीत शारापोव्हाने तब्बल 25 विनर्सचा मारा करताना कासत्किनाला निष्प्रभ केले. केवळ तीन आठवड्यांवर आलेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेसाठी आपण सज्ज असल्याचे शारापोव्हाने या विजयामुळे दाखवून दिले आहे.
शारापोव्हासमोर आता फ्रान्सच्या सहाव्या मानांकित कॅरोलिन गार्सियाचे आव्हान आहे. दरम्यान सेरेना विल्यम्सला पराभऊत करून विम्बल्डन विजेतेपद पटकावल्यानंतर पहिला सामना खेळणाऱ्या अँजेलिक कर्बरला ऍलिझ कॉर्नेटकडून 4-6, 1-6 असा पराभव पत्करावा लागला. कर्बरने तब्बल 32 नाहक चुका करताना आपल्या पराभवाला हातभार लावला. कॉर्नेटसमोर दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या ऍश्‍ले बार्टीचे आव्हान आहे.
फ्रान्सच्या 15व्या मानांकित बार्टीने पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ऍलिसन व्हॅन युटव्हॅन्तचा कडवा प्रतिकार 7-6, 6-2 असा मोडून काढत विजयी सलामी दिली. तसेच आणखी एका पहिल्या फेरीच्या सामन्यात नुकत्याच विवाहबद्ध झालेली झेक प्रजासत्ताकाची नववी मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाला हॉलंडच्या किकी बर्टन्सविरुद्ध 2-6, 2-6 अशी हार पत्करावी लागली.
पाचव्या मानांकित एलिना स्विटोलिनाने रुमानियाच्या मिहाएला बुझार्नेस्क्‍यूविरुद्ध 6-3, 6-7, 4-3 अशी आघाडी घेतल्यावर मिहाएलाने दुखापतीमुळे सामना सोडून दिला. मिहाएलाने गेल्या आठवड्यांत सॅन जोस स्पर्धा जिंकली होती. आणखी एका लढतीत अमेरिकन ओपन विजेत्या तिसऱ्या मानांकित स्लोन स्टीफन्सने फ्रॅंकॉईस आबांदाचा 6-0, 6-2 असा फडशा पाडताना आगेकूच केली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)