शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; दुष्काळावर कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्याची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण स्थिती आहे. शरद पवारांनी ३० एप्रिल, १२ व १३ मे या दिवशी सोलापूर, अहमदनगर व बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त गावांना, पाण्याअभावी सुकलेल्या फळबागांना व चारा छावण्यांना भेटी देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली.

दरम्यान, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळावर कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांची कैफियत व समस्या विस्तृत पत्रात मांडल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री व सचिवांसह तातडीने बैठक आयोजित करून दुष्काळग्रस्त प्रतिनिधींसह भेटीची अपेक्षा व्यक्त केली आहे.


शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेले संपूर्ण पत्र 

जाक्र १९/खास/दुष्काळ/१३
दिनांक – १३ मे, २०१९.
प्रिय

स.न.वि.वि.
कृपया मी आपणास लिहिलेल्या जाक्र २०१९/खास/अवर्षण/४५ व ४५ अ, दिनांक – ४ मे, २०१९ या संदर्भीय पत्रांचे अवलोकन व्हावे. महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी दिनांक ३० एप्रिल,२०१९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला भागास भेट दिली होती. ह्याच पार्श्वभुमीवर मी दिनांक १२ मे , २०१९ रोजी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आणि दिनांक १३ मे, २०१९ रोजी अहमदनगर व बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांस भेट दिली. दौऱ्यावेळी उपरोक्त भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांशी चर्चा करताना काही समस्य़ा प्रकर्षाने मांडल्या गेल्या , त्यांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.
अ) माण तालुका दौरा –
१. चारा छावणी- बिजवडी या गावी ग्रामस्थांशी चर्चा केली असता गावातील श्रम-संस्कार चारा छावणी चालकाने चारा छावणी चालविण्याकरीता प्रति जनावर रू. ९० हे अनुदान अपूरे असल्याचे सांगून प्रति जनावर रू. ११९ इतका खर्च येत असल्याचे खर्चाच्या तपशीलासह सांगितले. (सोबत तक्ता जोडला आहे.) भालवडी येथील चारा छावणी चालकाने चारा महाग असल्याचे, मका पिकाचा तुडवडा असल्याचे सांगितले. परिणामी भालवडी गावात दुधाचे उत्पादन घटल्याचे सोबतच्या शेतकऱ्यांनी सांगितले. पानवळ गावात चारा छावणीची मागणी अद्याप पुर्ण झाली नाही ह्या कडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले.
२. पिण्याचे पाणी – बिजवडी, शिंदी खुर्द, वावरहिरे , भालवडी , पानवळ इत्यादी गावी भेट दिली असता लोकसंख्येच्या प्रमाणात टॅंकर द्वारे पुरेसे पाणी देण्यात येत नसल्याचे, टॅंकरच्या खेपा अनियमित असल्याचे व पाण्याचा पुरवठा अशुद्ध होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. ह्या शिवाय शिंदी खुर्द गावातील जुना पाझर तलाव /मध्यम प्रकल्प यांची दुरूस्ती करण्याची आवश्यकता असल्याची बाब पुढे आली.
३. शिधा पत्रिकेवर धान्य वाटप – वावरहिरे ह्या गावात पिवळे रेशनकार्ड असूनही कुटूंबातील व्यक्ती नोकरी अथवा व्यवसायात असल्यामुळे शिधा पत्रिकेवर धान्य मिळत नसल्याची तक्रार प्राप्त झाली. वास्तविक केंद्र शासनाने अन्न सुरक्षेचा कायदा मंजूर केला असल्याने प्रत्येक नागरिकाला धान्य मिळेल याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे शिधा पत्रिकेधारे धान्य पुरवठा करणेत यावा.
४. रो.ह.यो. कामांची मागणी – जॉब कार्ड वाटप केले असूनही राष्ट्रीय ग्रामीण रो.ह.यो. अंतर्गत कामे उपलब्ध केली जात नाही. अशी तक्रार बिजवडी, वावरहिरे व इतर भेटी दिलेल्या गावातून ग्रामस्थांनी केली. माण तालुक्यातील बहुतांशी गावात हिच परिस्थिती असल्याचे दिसून आले.

५. फळबागांचे नुकसान- पाण्याअभावी डाळींब, आंबा वगैरे पिके पावसा अभावी जळून गेल्याची तसेच बहूतांशी फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्या वाचविणेची गरज असल्याचे सांगितले. सन २०१२-१३ च्या अवर्षणात दर हेक्टरी रू. ३५००० अनुदान फळबागा वाचविण्यासाठी दिले होते. त्याच धर्तीवर शासन निर्णय घेण्याची मागणी केली गेली.
६. पिक विमा नुकसान भरपाई – शेतकऱ्यांनी विम्याचे हफ्ते भरले. मात्र फळबागेचे, पिकांचे नुकसान झाल्यानंतर नुकसानभरपाई मिळाली नाही ही तक्रार देखील भेट दिलेल्या गावांतून पुढे आली.

ब) अहमदनगर- बीड दौरा –
माण तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा प्रत्यक्ष भेटीद्वारे घेतल्यानंतर मी दिनांक १३ मे रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात व पुढे बीड जिल्ह्यातील आष्टी,पाटोदा व बीड तालुक्यातील काही गावांना भेट दिली. ह्याही भागातील दुष्काळी परिस्थिती भिषण आहे. अहमदनगर-बीड सीमेवरील गावांतील भेटीवेळी उपरोल्लेखित समस्यांसह इतर बाबी प्रकर्षाने दिसून आल्या .
१. चारा छावणी – खडकत (ता. आष्टी) व नवगण राजूरी (ता. बीड) या गावातील चारा छावणी चालकांनी छावणी सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या संमतीची अट जाणिवपूर्वक घातली गेल्याचे व नागरिकांनी त्याविरूद्ध मा. हायकोर्टापर्यंत दाद मागितल्यानंतर अट शिथिल केल्याचे निदर्शनास आणले. दुष्काळासारख्या भिषण परिस्थितीचा सामना करताना विशिष्ट राजकीय हेतूने प्रेरीत दूजाभावाचे धोरण अवलंबणे हे प्रगल्भतेचे आणि संवेदनशीलतेचे प्रतिक नाही. यापूर्वी राज्यात असे कधीही झाले नव्हते. याकडे कृपया लक्ष द्यावे.
नवगण राजूरी येथील छावणी चालकाने गुरांच्या चारा छावणीकरीता दिले जाणारे अनुदान पाठपुरावा करूनही मिळत नसल्याने छावणी चालवणे केवळ अशक्य असल्याचे सांगितले. बीड मधील सर्व चारा छावणी चालकांनी हतबल होऊन देयके दिवसाअखेर न मिळाल्यास जनावरांना चारा देणे बंद करावा लागत असल्याचे समक्ष सांगितले. परंतू छावणी अनुदान मिळण्यातील दिरंगाई मुळे मुक्या जनावरांचे व जनावर मालकांचे हाल नको असे आवाहन करून आपणास प्रत्यक्ष भेटून मार्ग काढण्याचे आश्वासन छावणी चालकांना दिले.
चिंचोली काळदात, ता. कर्जत (अहमदनगर) , खडकत (ता. आष्टी), सौताडा (ता. पाटोदा) मधील छावणी चालकांनी जनावरांना टॅग लावण्याची प्रक्रिया क्लिष्ट असल्याचे व सर्व माहिती संगणकाद्वारे अपलोड करणे, वीज जाणे व इंटरनेट सुविधेत व्यत्यय येणे ह्या कारणाने अवघड होत असल्याचे सांगितले व ही जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी केली.

धनगर समाजातील प्रतिनिधींनी शेळ्या-मेंढ्या करीता चारा छावणीच्या धर्तीवर स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली. शेळी-मेंढी पालन करणारांच्या दृष्टीने हा मोठा दिलासा होईल.

२. पिण्याचे पाणी- हळगाव, खडकत ह्या आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुकडीचे पाणी राजकीय हेतूने विशिष्ट गावांनाच सोडण्यात आल्याची तक्रार केली. राज्यकर्त्यांकडून ही दूटप्पी व दुजाभावाची भुमिका योग्य नाही. कृपया आपण ह्यात लक्ष घालावे.
३. शिधा पत्रिकेवर धान्य वाटप – माण तालुक्यातील गावांप्रमाणेच ह्या भागातही दुष्काळी भागातील सर्व कुटूंबांना अन्नधान्य शिधा दुकानातून मिळत नसल्याची बाब समोर आली.
४. रो.ह.यो. कामांची मागणी- ख़डकत (ता. आष्टी) , सौताडा (ता. पाटोदा) गावांप्रणाचे इतर गावांतून रो.ह.यो. कामांची मागणी पुढे आली. बीड जिल्ह्यातील इमानगाव (ता.आष्टी) येथील सिंचन तलावातील गाळ रो.ह.यो. कामांतून काढण्यात यावा त्यामुळे लगतच्या बऱ्याच गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.
५. पिक विमा नुकसान भरपाई – खडकत (ता. आष्टी) गावी शेतकऱ्याने तक्रार केली की, विमाच्या हफ्त्यापोटी रू. ६०० जमा केले नतर पिक पाण्याअभावी जळून गेले तरी नुकसान भरपाई म्हणून केवळ रू.५० मिळाल्याची तक्रार केली. त्यास उपस्थितांनी दुजोरा दिला. दुष्काळी परिस्थितीने आधीच हवालदिल झालेल्या शेतकरी वर्गाची ही चेष्टा आहे. किरकोळ तांत्रिक कारणांमुळे विमा नाकारण्याकडे विमा कंपन्यांचा सतत कल असतो. ह्या विमा कंपन्यांची विशेष बैठक घेऊन त्यांना सुचना देणे गरजेचे आहे.
६.फळबागांचे नुकसान- पिंपळवंडी (ता. पाटोदा) गावात आंब्याच्या बागांचे पाण्याअभावी नुकसना होत असल्याचे दिसून आले. फळबागा वाचविण्यासाठी हेक्टरी रू.३५००० अनुदान देण्याची मागणी पुढे आली.
याशिवाय कर्जमाफीची अंमलबजावणी न होणे, हरभरा-तूर पिकांच्या खरेदीची जिल्हा मार्केटींग फेडरेशनने देयके न देणे , खतांच्या-चाऱ्याच्या किंमतींमध्ये भरमसाठ वाढ होणे ह्या तक्रारी देखील शेतकरी वर्गाने केल्या.
वरिल समस्यांबरोबरच सातारा, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना पाणी टंचाई समस्येवर कायमची मात करावयाची असल्यास जुन्या बंद पडलेल्या योजना पुनरूज्जिवीत करणे, दुरूस्त्या करणे , कोरड्या तलावातील गाळ काढणे, तलाव-ओढ्यांचे खोलीकरण करणे अशा उपाय-योजना सुचविण्यात आल्या.
महोदय, सोलापूर-सातारा, बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील काही गावांनी मी भेटी दिल्या असल्या तरी महाराष्ट्राच्या बहूतांशी भागावर दुष्काळाचे सावट आहे. १९७२ सालच्या दुष्काळापेक्षा ही परिस्थिती भीषण आहे. परतीच्या मान्सूनने दडी मारल्याने प्रामुख्याने रबी पट्टयातील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. कृपया मी विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे. तसेच संपुर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत.
माझ्या सोलापूर-सातारा, अहमदनगर-बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी दुष्काळात हवालदिल झालेल्या जनतेची कैफियत आपणासमोर मांडण्यासाठी व समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करण्यासाठी दुष्काळी भागातील काही प्रतिनिधींसह आपल्या भेटीची वेळ मिळावी. जनतेला ह्या संकटातून तात्काळ दिलासा मिळावा व कायमस्वरूपी काही ठोस उपाययोजना करता येईल का याचा ही विचार व्हावा यासाठी संबंधित विभागाचे मंत्री, सचिव यांचेसह बैठक तातडीने आयोजित होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
कळावे,
आपला,

शरद पवार

श्री. देवेंद्र फडणवीस,
माननीय मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य.
६ वा मजला, मंत्रालय, मुंबई-३२


Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)