शरद पवारांनीच सोडविला माढ्याचा तिढा !

राष्ट्रवादीत प्रवेश देऊन संजय शिंदे यांची उमेदवारी केली घोषित

सोलापूर: राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच बारामती येथील पक्षाच्या कार्यक्रमात संजय शिंदेची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपा प्रवेश झाल्यानंतर संजय शिंदे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शरद पवार यांनी घेतलेली माघार यामुळे माढा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी मोठा तिढा निर्माण झाला होता. मात्र, हा तिढा आज खुद्द पवारांच्या उपस्थितीत सुटला आहे.

शिवसेना-भाजपाच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थीतीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. सुरुवातीला माढ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव चर्चेत होते. मात्र अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून निवडणूक लढवायची असल्याने एकाच घरातून किती जणांनी लढायचे असे विचारत शरद पवार यांनी माघार घेतली होती.

सध्या राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील लोकसभेत माढ्याचे प्रतिनिधीत्व करतात. विजयसिंह यांचे पुत्र राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र, उमेदवारी मिळण्याची फारशी शक्‍यता दिसत नसल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपामध्ये गेल्याने राष्ट्रवादी माढ्यातून कोणाला उमेदवारी देणार, याची चर्चा होती. मात्र, आज या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून माढ्याचा तिढा सुटला.

दरम्यान, संजय शिंदे हे मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जातात. त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीला रामराम करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात त्यांना थोड्या फरकानं पराभव पत्करावा लागला. मात्र, आता संजय शिंदेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे माढ्यातील लढत अधिकच रंगतदार होईल, असे दिसून येते.

https://twitter.com/PawarSpeaks/status/1109074976575873026

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)