शरद पवार-नारायण राणे भेटीने तर्क-वितर्कांना उधाण

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभा सदस्य बनलेले नारायण राणे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या भेटीमुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राणे पुन्हा विरोधकांच्या गोटात परततील, अशी शक्‍यता व्यक्त करणाऱ्या चर्चांना तोंड फुटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे पवार रत्नागिरीकडे जाताना कणकवलीत राणे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची सदिच्छा भेट घेतल्याचे म्हटले. आमच्यात केवळ पाच मिनिटे भेट झाली. पवार यांनी नारळपाणी घेतले. विरोधकांबरोबर जाण्याविषयी कुठलीही चर्चा झाली नाही.

आमच्या भेटीतून कुठला राजकीय अर्थ लावला जाऊ नये. माझी कुणाशीही कुठल्याच प्रकारची चर्चा सुरू नाही, असे नंतर राणे पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. मात्र, पवार आणि राणे यांच्यात राजकीय स्थितीबाबत अनौपचारिक चर्चा झाली. त्यांच्या आणखी काही भेटी होण्याची शक्‍यता आहे, असे राष्ट्रवादीच्या सुत्रांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेशी समेट करण्याच्या दृष्टीने भाजप प्रयत्नशील असल्याचे दिसते. त्यासंबंधी सुरू असलेल्या हालचालींमुळे राणे भाजपवर नाराज असल्याचे समजते.

-Ads-

राणेंनी 2005 मध्ये शिवसेनेला रामराम ठोकला. त्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. मागील वर्षी कॉंग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. आता भाजपवर नाराज असल्याची चर्चा असणारे राणे पुन्हा शिवसेना किंवा कॉंग्रेसमध्ये परतण्याची शक्‍यता नाही. यापार्श्‍वभूमीवर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून राणेंना उमेदवारी देण्याचा विचार राष्ट्रवादी करत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच पवार-राणे भेटीचे राजकीय महत्व वाढले आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)