पवारसाहेब, खरं काय ते बोला!

बारामतीतील घरासमोर आंदोलन करीत मराठा आंदोलक करणार सवाल

बारामती – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार एकीकडे पाठिंबा जाहीर करतात तर देशात आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असेही म्हणतात. तर, घटनादुरुस्तीला मदतही करू, अशीही भूमिका मांडतात. पवार यांच्या याच तिहेरी भूमिकेमुळे मराठा समाजात संभ्रम निर्माण झाल्याने पवार यांच्या दुटप्पीपणा विरोधात मराठा समाजाने आता बारामतीत थेट पवार यांच्या घरापुढेच ठिय्या आंदोलनाचा एल्गार केला असून खरं काय ते बोलण्याविषयी आवाहन करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यघटनेत मागास समाजांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. मराठा समाजालाही त्यापद्धतीने आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या माध्यमातून सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे असताना आरक्षणाबाबत पवार यांनी वेळोवेळी केलेल्या दुटप्पी विधानांबाबत राजकीय वर्तुळातून नाराजी व्यक्त केली गेली आहे. सत्तेवर असताना मराठा समाजासाठी काहीच केले नाही आणि आता, या मुद्यावर समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही पवार यांच्यावर सत्ताधारी पक्षांकडून केला गेला आहे. याचाच परिणाम म्हणून बारामती तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शरद पवार यांच्या शारदानगर येथील निवासस्थानाच्या प्रवेशद्वारासमोर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि.9) सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन होणार असून यामध्ये तालुक्‍यातील मराठा समाजातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील युवक आणि समाज बांधव सहभागी होणार आहेत.

राज्यात आषाढी एकादशीपासून मराठा आरक्षणाचा प्रश्‍न पेटल्यानंतर राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शरद पवार यांनी आरक्षणासाठी घटनादुरूस्तीचा उपाय सुचविला होता. मात्र, त्यांचा हा उपाय खोडून काढीत तीन महिन्यांत आरक्षणाचा प्रश्‍न निकाली काढला जाईल, असे सांगून नारायण राणे यांनी पवार यांचे म्हणणे खोडून काढले; त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा पवार यांच्याकरिता राजकीय प्रतिष्ठेचा विषय झाला होता. यातूनच पवार यांच्याकडून आर्थिक निकषांवर आरक्षणाबाबतही वक्तव्य केले गेले. यामुळे चर्चेला उधाण येवून आरक्षणाबाबत पवार यांची नेमकी भूमिका काय? असे सवाल केले जावू लागले. याच काळात सरकार आरक्षणासाठी सकारात्मक असताना शरद पवार हे आरक्षणाआड दुटप्पी राजकारण करीत असून त्यांच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडली. राजकीय घडमोडींच्या याच पार्श्‍वभूमीवर आता मराठा आंदोलक बारामती येथे शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणार असून पवार यांना सवाल करणार आहेत. आंदोलकांना पवार आता काय उत्तर देणार, यावर आगामी राजकीय गणितं ठरणार असल्याने अन्य पक्षांचेही या बारामतीतील आंदोलनाकडे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)