सातारा – राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार रविवार दि. 12 मे रोजी माण तालुक्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते माण तालुक्यातील दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत. सकाळी 9 वाजता शिंदी खुर्द, ता. माण येथील महाश्रमदान वॉटरकप कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी सव्वा दहा वाजता मलवडी येथील चारा छावणीस भेट देणार आहेत.
साडे आकरा वाजता ते वावरहिरे येथील रोजगार हमीच्या कामांची पाहणी करणार आहेत. तर दुपारी साडेबारा वाजता मार्डी येथील फळबागांची ते पाहणी करणार आहेत. दुपारी पाऊने दोन वाजता भालवडी येथील चारा छावणी व पाणी टंचाईची माहिती घेणार आहेत. दुपारी पाऊने तीन वाजता पानवण येथील वॉटरकप कामांची व पाणी टंचाईची पाहणी करणार आहेत. दुपारी साडे तीन वाजता पाणी टॅंकर शुभारंभास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर साडे चार वाजता आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, खा. शरद पवार यांचा हा दुष्काळी दौरा सांगण्यात आला असला तरी ते यानिमित्ताने माढा लोकसभा निवडणूकीत झालेल्या घडामोडींची आणि मतदानाची माहिती घेण्याची शक्यता आहे. माण तालुक्यात गोरे बंधूनी भाजपच्या उमेदवाराला पाठींबा दिल्यामुळे माणमधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कितपत मताधिक्क्य प्राप्त होवू शकेल तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने ते आगामी विधानसभा निवडणुकीचीदेखील यावेळी चाचपणी करताना दिसून येतील.