विविधा: शंतनुराव किर्लोस्कर

माधव विद्वांस

महाराष्ट्राचा औद्योगिक विकास साधणारे उद्योगमहर्षी, आधुनिक उद्योजक संस्कृतीचे प्रवर्तक शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर यांची आज जयंती. त्यांचा जन्म 28 मे 1903 रोजी सोलापूर येथे झाला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण सातारा जिल्ह्यातील औंध येथे झाले. नंतर त्यांनी उर्वरित शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे घेतले. त्यानंतर 1922 मध्ये त्यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एमआयटी) मध्ये प्रवेश घेतला. मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या शिक्षणानंतर 1926 मध्ये ते भारतात परतले. मेसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एमआयटी) च्या पदवीधर झालेल्या पहिल्या काही तरुण भारतीयांपैकी ते एक होते. मात्र, परदेशी जीवनाचे प्रलोभन समोर असतानाही ते आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट महाराष्ट्रात किर्लोस्करवाडी येथे आले.

महाराष्ट्रात उद्योग भरपूर; पण मराठी उद्योजक कमी अशी अवस्था होती. महाराष्ट्र शेतीप्रधान प्रदेश असल्याने त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शेंगा फोडण्याच्या यंत्रापासून ते उसाचा रस काढण्याच्या चरकापर्यंतची यंत्रे, साखर निर्मिती यंत्रे विकसित करून त्याचे उत्पादनही सुरू केले. यांत्रिक शेतीचे महत्त्व शेतकऱ्याला समजावून सांगण्यासाठी ते खेडोपाडी फिरले. त्यासाठी चर्चासत्रे, प्रदर्शने भरविली. तसेच लेथ मशिन्स ते ऑईल इंजिन्सपर्यंत, इस्पितळांतील विशिष्ट फर्निचरपासून ते हॉटेल उद्योगांतील आवश्‍यक उपकरणांपर्यंत आणि बेअरिंग्जपासून ते फोर्जिंग उत्पादनांपर्यंत त्यांनी मजल मारली. त्यांच्या वडिलांनी 1888 साली बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते. किर्लोस्करवाडी येथे त्यांनी 1910 साली कारखाना काढला तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी पहिली औद्योगिक वसाहत स्थापली. या रोपट्यावर शंतनुरावांनी किर्लोस्कर उद्योगसमूहाचा वटवृक्ष उभा केला.

1946 मध्ये शंतनुरावांनी किर्लोस्कर इलेक्‍ट्रिक कंपनी व किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड या कंपन्याची अनुक्रमे बंगलोर व पुणे येथे स्थापना केली. पुढील काळात किर्लोस्कर न्युमॅटिक्‍स, किर्लोस्कर कमिन्स, किलोस्कर ट्रॅक्‍टर्स, किर्लोस्कर सिस्टिम्स अशा कंपन्यांची वाढ केली. त्यांची उत्पादनांची विक्री फक्‍त भारतात नव्हे तर जगात होऊ लागली. किर्लोस्कर उद्योगसमूहाच्या प्रगतीबरोबरच त्यांना सेवा देणाऱ्या सुमारे 500 छोट्या उद्योजकांचे कारखानेही उभे राहिले. त्यातून रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली. परदेशांत कारखाने स्थापन करण्याचे अनोखे धाडस शंतनुरावांनी केले होते. 1940-41 च्या दरम्यान शेअरबाजारात मराठी कंपन्यांना कोणतेही स्थान नव्हते. मात्र, किर्लोस्करांनी शेअरबाजारात प्रवेश केला. हे करीत असताना बदलत्या काळाप्रमाणे त्यांनी त्यांच्या उत्पादनात सुधारणा व नावीन्य आणले.

शंतनुराव हे रसिक होते. त्यांना पाश्‍चात्य संगीतही आवडायचे. ते साहित्याचे अभ्यासक होते. चित्रकलेतही त्यांना अभिरुची होती. त्यांनी आपल्या आयुष्यातील आठवणी व अनुभव “कॅक्‍टस अँड रोझेस’ या आत्मवृत्तात लिहिल्या आहेत. या उद्योगमहर्षींचे 24 एप्रिल 1994 रोजी पुणे येथे निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)