पोपटलाल ओसवाल यांचे गौरवोद्गार : प्रतिष्ठानच्यावतीने गोशाळेस आर्थिक मदत
वाई – वेळे, ता. वाई येथील करुणा मंदिर गोशाळेला व भोर (आंबाडे) येथील जानुबाई माता गोशाळेला शंकरी कट्टा प्रतिष्ठानच्यावतीने बेंदूर सणाचे औचित्त साधून रोख स्वरूपात मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. प्रतिष्ठानचे हे गोशाळेला मदत करण्याचे सहावे वर्ष आहे. करुणा मंदिर गोशाळेचे विश्वस्त पोपटलाल ओसवाल, दीपक ओसवाल व जानुबाई माता गोशाळेचे विश्वस्त प्रदीप खोपडे यांना आर्थिक मदतीचा चेक प्रदान करण्यात आला. तसेच करुणा मंदिर वेळे येथे जनावरांना पिण्यास पाण्याची कमतरता भासत असल्याने 2 पाण्याचे टॅंकर देण्यात आले. या कार्यास नितिन जगताप (विघ्नेश डेव्हलपर्स) व सौरभ शशिकांत पवार यांनी विशेष सहकार्य केले. शंकरी कट्टा प्रतिष्ठान गेली सहा वर्षे कडबा, गूळ, पशुखाद्य या स्वरूपात मदत करीत होती.
पोपटलाल ओसवाल म्हणाले, गोवंशहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी काटेकोर पद्धतीने होत असल्याने भाकड जनावरांचा ओघ हा गोशाळांकडे वाढलेला आहे. परिणामी त्यांचा सांभाळ करताना गोशाळा संस्थेला तारेवरची कसरत करावी लागते. तरी हिंदुत्ववादी संघटनांनी भाकड गायींना कत्तल खाण्याकडे जाण्यापासून अवश्य वाचवावे. करुणा मंदिर गोशाळा त्यांचा सांभाळ करताना कधीही मागे हटणार नाही. वाई येथील धर्मपुरीतील शंकरी कट्टा प्रतिष्ठानचे कार्य गौरवास्पद असून इतरही संघटनांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.
प्रदीप खोपडे म्हणाले, शेतकरी हा भाकड गायीनाच गोशाळेत आणून सोडतो. ही अतिशय चुकीची बाब असून गाय ही एकवेळ दूध देत नसेल, परंतु गायीच्या गोमुत्राला व शेणखताला बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे गोमाता शेतकऱ्यांना कधीच जड होवू शकत नाही. याची जाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठेवल्यास गोशाळेकडे येणाऱ्या भाकड जनावरांचे प्रमाण कमी होवून त्यांचा सांभाळ करणे गोशाळेच्या विश्वस्थांना अवघड जाणार नाही. जैन समाज व समाजातील दानशूर व्यक्तींमुळेच गोशाळेत गायींचा सांभाळ करणे सोपे जाते. यावेळी शंकरी कट्टा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.