#CWC19 : शकीब अल हसन – एकांडा शिलेदार

लंडन – विश्‍वचषक स्पर्धेतील भरवशाचा अष्टपैलू म्हणून कोणाचे पहिल नाव येईल तर ते बांगलादेशचा शकीब अल हसन याचेच. भलेही त्याच्या संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यास अपयश आले असेल परंतु त्याने दिलेली लढत खऱ्या अर्थाने एकाकी ठरली. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर त्याने नेत्रदीपक कामगिरी केली.

बांगलादेशने या स्पर्धेतील नऊ सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व अफगाणिस्तान यांच्याविरूद्ध विजय मिळविला. या सर्वच विजयांमध्ये शकीब याचा सिंहाचा वाटा होता. शकीब हा डावखुरा खेळाडू असल्यामुळे त्याच्या फलंदाजीची शैली नेहमीच आकर्षक असते. विशेषत: त्याचे कव्हरड्राईव्ह, स्क्वेअरड्राईव्ह, ऑनड्राईव्ह, स्वीपचे फटके आदी फटके खरोखरीच प्रतिस्पर्धी खेळाडूंनाही मंत्रमुग्ध असतात. या विश्‍वचषक स्पर्धाही त्यास अपवाद नव्हती. त्याने या स्पर्धेत पाच अर्धशतके व दोन शतके टोलवित 606 धावा केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वेस्ट इंडिजविरूद्ध तीनशे धावांचे लक्ष्य गाठ्‌ताना त्याने केलेली नाबाद 124 धावांची खेळी संस्मरणीय होती. त्याआधीच्या सामन्यात त्याने इंग्लंडविरूद्धही शतक झळकाविले होते. या शतकामुळेच त्याच्या खेळातील आत्मविश्‍वास उंचावला. वेस्ट इंडिजच्या संघात जेसन होल्डर, शेल्डॉन कॉट्रेल आदी भेदक गोलंदाज असताना त्याने कोणतेही दडपण न घेता शतक केले.

बांगलादेशच्या दुर्देवाने शकीबला अन्य सामन्यांमध्ये त्याच्या सहकाऱ्यांकडून अपेक्षेइतकी साथ मिळाली नाही. त्यामुळेच त्याच्या संघाला पराभव पत्करावा लागला. शकीब याच्या खेळात रोहित शर्मा किंवा डेव्हिड वॉर्नर यांच्यासारखी आक्रमकता नाही. तरीही एकेरी व दुहेरी धावांवर भर देत धावांचा वेग कसा वाढवायचा याचा प्रत्यय त्याने घडविला आहे. त्याचप्रमाणे सामन्यातील परिस्थितीनुसार कशी फलंदाजी करायची याचेही नियोजन करण्याबाबत त्याने स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे.

शकीबने या स्पर्धेत 11 विकेट्‌स घेतल्या. फिरकी गोलंदाज म्हणून जबाबदारी सांभाळताना त्याने धावा रोखण्याबरोबरच विकेट्‌सही कशा मिळवायच्या याचाही परिपाठ त्याने दिला. प्रतिस्पर्धी फलंदाजास फटकेबाजीपासून कसे रोखून ठेवायचे याबाबतही त्याची शैली कौतुकास्पद होती.

आता पुढच्या विश्‍वचषकासाठी संघबांधणीची जबाबदारी त्याने घेतली पाहिजे. जरी तो कर्णधार नसला तरी त्याची शतकी किंवा अर्धशतकी खेळी वाया जाऊ नये यासाठी त्याने या कार्यासाठी लक्ष केंद्रीत केले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)