मुद्दा : शबरीमला मंदिराचा प्रश्न आणि स्त्रीमुक्ती

-अशोक सुतार

धर्मसत्तेने तत्कालीन दलित व शूद्रांना तसेच महिलांना मंदिर बंदीचा फतवा काढला होता. स्वातंत्र्यापूर्वी शेकडो वर्षे या परंपरा जपल्या जात होत्या. त्यांना शिक्षणाचाही अधिकार नव्हता. परंतु आज जग बदलले आहे, विज्ञान युग आले आहे; तरीही मानव आपल्या परंपरा, रूढी आणि अंधश्रद्धांना चिकटून आहे. ही परिस्थिती बदलणे आपल्याच हातात आहे, तरच स्त्री मुक्‍तीचे गोडवे गाण्याचा अधिकार समाजाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शबरीमला मंदिराचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आणि न्यायालयाने महिलांना दर्शन घेण्यास परवानगी दिली. परंतु तथाकथित धर्मवाद्यांनी अजूनही महिलांना सदर मंदिरात प्रवेश मिळू देण्यास मज्जाव केला आहे. धर्मसत्ता आणि न्यायसत्ता यांच्यात दरी अडत असल्याचे यामुळे दिसून येत आहे.

केरळमधील या वादग्रस्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन महिलांनी पोलिस संरक्षणात नुकताच प्रवेश केला. या महिला जवळपास 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत. शबरीमलाच्या मंदिराच्या परंपरेनुसार, 10 ते 50 वयोगटातील महिलांना या मंदिरात प्रवेशबंदी होती. ही बंदी सर्वोच्च न्यायालयाने असंविधानिक ठरवली.

ऑक्‍टोबरमध्ये मंदिराचे दरवाजे उघडले. अनेक महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. पण सगळेच प्रयत्न अयशस्वी ठरले. अनेक महिलांना विरोधकांनी पर्वताच्या पायथ्याशीच रोखले. तर एक महिला मंदिराच्या मुख्य द्वारापर्यंत आली असता पुजाऱ्यांनी मंदिर बंद करण्याची धमकी दिली. काही राजकारण्यांनी व फिल्मस्टारनी पुजारी व भक्‍तांचे समर्थन केले. त्या पाठीमागे आपला चाहता वर्ग गमावेल, अशी भीति संबंधिताना वाटली असणार आहे. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्‍क देण्याच्या आभासी घोषणा करणे खूप सोपे आहे, परंतु असे धार्मिक, सामाजिक प्रश्‍न उभे राहिले की- भले भले गप्प बसतात.

महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, कर्वे, राजाराम मोहन रॉय इ. समाजसुधारकांना समाजातील अंधरुढी विरोधात आवाज उठवताना किती त्रास झाला असेल, हे आपण समजू शकतो. पण काळ बदलला तरी लोक बदलण्यास तयार नाहीत. शबरीमला मंदिरात दोन महिलांनी नुकताच प्रवेश केल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. शुद्धिकरण केल्यानंतर मंदिर पुन्हा सुरू करण्यात आले, अशी प्रतिक्रिया पुजाऱ्यांनी दिली आहे.

अजूनही धर्मव्यवस्थेचा पगडा समाजमनावर आहे. तो बदलणे काळाची गरज आहे. आपण विज्ञानयुगात आलो तरी अंधश्रद्धा, जुनाट चालीरिती बंद झालेल्या नाहीत; त्या अशा प्रकरणांनी दिसून येतात, ही खेदाची गोष्ट आहे. डिसेंबर महिन्यात बिंदू आणि कनकदुर्गा या दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. पण विरोध झाल्याने त्या मंदिरात जाऊ शकल्या नाहीत. 28 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटाच्या महिलांना मंदिरात प्रवेश दिला जावा, असा आदेश दिला होता. त्यानंतर काही महिलांनी मंदिरात जाऊन पूजा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना भक्‍तगण व पुजाऱ्यांकडून विरोध झाला.

धार्मिक परंपरेनुसार, मासिक पाळीतील वयातील म्हणजे 10ते 50 वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. भाजप आणि संबंधित संघटना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करत आहेत. शबरीमलाच्या मंदिरात स्त्रीयांच्या प्रवेशावरचे निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरमध्ये उठवल्यानंतरदेखील महिलांना सहजपणे अयप्पा स्वामींचे मंदिरात जाऊन दर्शन घेता आले नाही. यामुळे धर्मसत्तेची किती मोठी पक्‍कड समाजमनावर आहे, हे दिसून येत आहे. सदर मंदिरात अनेक महिलानी दर्शन घेण्यासाठी प्रयत्न केले; परंतु पोलीस बंदोबस्त असतानाही त्या महिलांना भक्‍तांच्या बळजबरीमुळे माघारी जावे लागले.

महाराष्ट्रातील आक्रमक स्त्री संघटनांनी 17 नोव्हेंबरला केरळमध्ये जाऊन वादग्रस्त शबरीमलाच्या मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. विरोधकांना आव्हान देत त्यांनी मंदिर प्रशासनाला, मंदिरात महिला प्रवेश करण्यासाठी भाग पाडले. महिलांच्या हक्‍कासाठी नेहमीच आंदोलन करणाऱ्या देसाईना शबरीमलाच्या मंदिरात जाण्यापूर्वीच विमानतळावर भक्‍तमंडळींनी अटकाव केला होता. त्यात धर्मवादी विचारांच्या पक्षांचे कार्यकर्ते जास्त प्रमाणात होते. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी 17 नोव्हेंबरला मंदिर प्रवेशाची घोषणा केली होती, तेव्हा त्यांना 300हून अधिक धमक्‍या आल्या होत्या.

आज स्त्रीमुक्ती, समानतेचे वारे वाहत असताना लोक जुन्या परंपरा पाळत आहेत. दुसरीकडे महिलांना आपले संविधानिक अधिकार मिळविण्यासाठी समाज व धर्मामार्तंडांचा रोष पत्करून लढावे लागत आहे, हे बरे नव्हे. शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी अनेक महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले ; परंतु पोलीस बंदोबस्तातही आंदोलक महिलांना भक्‍त व पुजाऱ्यांनी मंदिरात जाण्यास मज्जाव केला. फिल्मस्टार व राजकीय नेतेही विरोधकांची बाजू उचलत असल्याचे दिसते.

मंदिर व मंदिरातील प्रवेश यावर समाजातील विविध घटकांसाठी समाजसुधारकांनी अनेक आंदोलने केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथे तत्कालीन दलितांना काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी आंदोलन मोठे आंदोलन केले होते. साने गुरुजी यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन केले होते, याकडे यानिमित्ताने लक्ष वेधणे क्रमप्राप्त ठरते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)