पुणे – जिल्हा परिषदेच्या शाळांमधील लेझीम खरेदी घोटाळा, शिक्षकांच्या बदल्यांसाठी अवघड आणि सोप्या क्षेत्रातील शाळांमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केलेली हेराफेरी, निकृष्ट क्रीडासाहित्याचा पुरवठा यासह अन्य गोष्टींतही शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ सुरू असून अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे याविरोधात जिल्हा परिषदेसमोर “पोतराज आंदोलन’ करण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांनी दिला आहे.
शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने घोषित केलेले अवघड आणि सोप्या शाळा यादीत आंबेगावचे गटशिक्षणाधिकारी पोपट महाजन यांनी संबंधित शिक्षकाला लाभ मिळावा म्हणून गेल्या दोन वर्षांपासून खोटी माहिती देऊन दिशाभूल केली आहे.
ही बाब निदर्शनास आणून दरेकर म्हणाले, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत संबंधित लाभार्थ्यांना शासन अनुदान देत असूनही जिल्ह्यातील संस्था त्या विद्यार्थ्यांकडून फी घेत आहेत. दुसरीकडे शासनाचे अनुदानही संस्था घेत आहेत. त्यामुळे या संस्थांवर कारवाई करून गोरगरीब विद्यार्थ्यांचे पैसे त्यांना परत मिळावेत. जिल्हा परिषदेकडून 2018-19 मध्ये शाळांना क्रीडासाहित्य पुरविण्यात आले.
त्या साहित्यामध्ये लेझीम, रिंग, फुटबॉल, रॅकेट आणि नेट आदी निकृष्ट दर्जाचे साहित्य संबंधित पुरवठाधारकाने केले असून त्या संदर्भात जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत ठराव केला होता. त्या ठरावामध्ये 50 लाख रुपये संबंधित ठेकेदाराकडून वसूल करून कारवाई करण्याचे ठरले होते. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही.