गिरणी कामगारांसाठी ठाणे व कल्याणमध्ये  7 हजार घरे बांधणार

मुंबई: गिरणी कामगारांसाठी आता राज्य सरकार ठाणे व कल्याणमध्ये 7 हजार घरे बांधणार आहे. या घरांसाठी येथील 11 हेक्‍टर जागा राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणार आहे. त्याशिवाय गिरण्यांच्या जागांव्यतिरिक्त राज्य सरकारच्या इतर जमीनींवर येत्या दोन ते तीन वर्षात 9 ते 10 हजार घऱे बांधण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांनी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाला आज दिले.
गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांच्या दालनात गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली. गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी फक्त 16 हजार 500 घरे होतील. पण 1 लाख 75 हजार गिरणी कामगारांनी घरांसाठी अर्ज केल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी सरकारच्या निदर्शनास आणले. त्यावर गिरणी कामगारांच्या घरांसाठी कल्याण व ठाण्यातील 11 हेक्‍टर महसुली जमीन दिली आहे. गिरणी कामगारांच्या संघटनेनेही या जमिनीला पसंती दिली आहे. या जागेवर 7 हजार घरे उपलब्ध होऊ शकतील असे महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. त्यावर ठाणे व कल्याणमधील ही जमीन म्हाडाला हस्तांतरित केली जाईल. या जमिनी दाखवण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले जातील असे आश्वासन जैन यांनी यावेळी गिरणी कामगारांना दिले.
एमएमआरडीएकडून गिरणी कामगारांसाठी बांधण्यात येणा-या एकूण घरांपैकी पन्नास टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय झाला आहे. ही घरे त्वरीत म्हाडाला हस्तांतरित करून या घरांची लवकरच लॉंटरी काढली जाईल असे आश्वासन जैन यांनी यावेळी दिले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)