इंदापुरात सात जणांना व्हायचंय आमदार

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे मागितली उमेदवारी
संतोष गव्हाणे

पुणे – पुणे जिल्ह्यातील वर्चस्व कायम ठेवण्याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधानसभेची जोरदार तयारी केली जात असताना विधानसभेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यात कॉंग्रेसबरोबर आघाडीचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवून पक्षाची ताकद पडताळणीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा प्रयत्न असला तरी यातून इंदापुरात मात्र पक्षाचीच कोंडी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, इंदापुरातून विधानसभा लढविण्यासाठी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह सात जणांनी अर्ज दाखल केले आहेत. आघाडीसह किंवा शिवाय, निवडणूक लढविणारच, अशी अनेकांची भूमिका असल्याने आघाडी झाली तरी कॉंग्रेसचे नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यापुढे बंडखोरांचे आव्हान असणार, हे निश्‍चित मानले जात आहे.

पुणे जिल्ह्यात अद्यापही राष्ट्रवादी कॉंग्रेसची चांगली ताकद आहे. याच बळावर अधिकाधिक विधानसभा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रयत्न असणार आहेत. यातूनच कॉंग्रेसबरोबर आघाडी केल्यास आणि स्वबळावर निवडणूक लढविल्यास किती जागा मिळू शकतील, याचा अंदाज घेण्याकरिता पक्षाकडून विधानसभेकरिता इच्छुकांचे अर्ज मागिवण्यात आले. विशेष म्हणजे यात इंदापुरातून सर्वाधिक म्हणजेच सात जणांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज पाठविले.

यामध्ये विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह माजी आमदार कै. गणपतराव पाटील यांची सून व कळसच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या वैशाली प्रतापराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव घोगरे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेशकुमार झगडे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ यांचा समावेश आहे. ही सगळी मातब्बरांची नावे पाहता राज्यामध्ये कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाची आघाडी झाली तरी राष्ट्रवादीतील इच्छुकांमुळे ऐनवेळी बंडखोरी होण्याची शक्‍यता अधिक आहे. यामुळे सोपी वाटणारी निवडणूक माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकरिता अवघड ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याकरिता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. यामुळे इंदापूर तालुक्‍यातून सुळे यांना 70 हजारांपेक्षा अधिक मताधिक्‍य मिळाले, असे मानले जात आहे. परंतु, मतांची ही आघाडी कॉंग्रेसमुळे नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळेच सुळे यांना मिळाली असल्याचा दावा अनेकांनी केला होता. परंतु, अशाही स्थितीत सुळे यांच्या विजयानंतर पवार आणि पाटील कुटुंबाची जवळीक वाढली आहे.

यातून आघाडीचा निर्णय झाल्यास इंदापूरची जागा कॉंग्रेसकडे जाण्याची शक्‍यता असल्याचे मानले जात असले तरी राज्यात आघाडी झाली नाही तरी चालेल; मात्र, इंदापुरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही, असे वक्‍तव्य अजित पवार यांनी पूर्वी केलेले असल्याने पडद्यापुढे आणि पडद्यामागे दिसणारे चित्र वेगळे आहे. यामुळे हर्षवर्धन पाटील यांना वाटते तेवढी निवडणूक निश्‍चित सोपी नसल्याचे उघड आहे. आजही अजित पवार यांचा कल दत्तात्रय भरणे यांनाच उमेदवारी देण्यावर असल्याचे त्यांनीही वेळोवळी स्पष्ट केले आहे. तर, याउलट सभापती प्रवीण माने यांना खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ असल्याचे मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीत तरूण चेहऱ्यांना तसेच समाजातील असलेला युवकांचा कल पाहून उमेदवारी दिली जाणार असल्याचे पक्षाध्यक्ष पवार यांनी स्पष्ट केले होते.

यामुळे सध्या आमदार भरणे यांनी इंदापुरात मोठी कामे केली असली तरी युवा मतदारांत सभापती प्रवीण माने यांनी क्रेझ निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माने यांनी विकासकामांत आघाडी घेत स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली आहे, त्यांच्या या कामावर शरद पवार खूश असल्याने माने यांचे नावही विधानसभा उमेदवारीकरिता आघाडीवर आहे.

बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनीही मोट बांधली आहे. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा मोठा भरणा त्यांच्या ताफ्यात असल्याने निवडणूक एकहाती फिरवण्याची धमक जगदाळे यांच्यात असल्याने त्यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे. ही स्थिती पाहता पाटील यांना केवळ आघाडीच्या मुद्यावर सोपी वाटणारी निवडणूक अवघड ठरणार आहे. यामुळेच राष्ट्रवादीकडून मागविलेले इच्छुकांचे अर्ज म्हणजे इंदापुरसाठी तरी पाटलांसाठी डोकेदुखी मानली जात आहे.

सभापती माने यांच्यामुळे चित्र बदलले…
इंदापूर विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यातच यावेळीही आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातच मुख्य लढत होईल, असे अंदाज बांधले जात होते. परंतु, सभापती प्रवीण माने यांनीही विधानसभेसाठी तयारी दर्शविल्याने इंदापुरातील चित्रच बदलले आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे सभापती माने यांच्या कामगिरीवर कमालीचे खूश आहेत.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तसेच सोनाई परिवाराकडून शेतकऱ्यांकरिता करण्यात आलेले विकासात्मक उपक्रम पाहून पवार यांनी प्रवीण माने यांच्या नियोजनाचे मोठे कौतूक केले आहे. तसेच, त्यांच्या उमेदवारीबाबत थेट साहेबांनाच तालुक्‍यातील हजारो युवकांनी गळ घातल्याने इंदापूरच्या उमेदवारीसाठी निश्‍चितच पेच निर्माण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)