सातारा पालिकेच्या नियोजन बैठकीला नगरसेवकांची दांडी
सातारा – सातारा नगरपालिकेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या नियोजन बैठकीला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह केवळ सात नगरसेवकांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नगरसेवकांच्या तुटपुंज्या उपस्थितीमुळे त्यांना वर्धापनदिनाचे अजिबात गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. सातारा नगरपालिकेचा वर्धापनदिन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने त्याचे नियोजन करण्यासाठी सोमवारी सातारा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक धनंजय जांभळे, फरांदे, शेंडे, तुकाराम भोसले, विकास गोसावी यांनीच उपस्थिती लावली. साताऱ्यातून एकूण 42 नगरसेवक निवडून दिले आहेत. त्यापैकी केवळ सात नगरसेवकांनी या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे अन्य नगरसेवकांना वर्धापन दिनाचे गांभीर्य नाही की काय, असा प्रश्न सोमवारी अनेकांनी उपस्थित केला. वर्धापनदिनाचे औचित्य साधून पालिकेच्या इमारतीसह काहीच स्मारकांवर रोषणाई केली जाते. प्रतीवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामध्ये ग्रुप डान्स स्पर्धा, बुद्धिबळ, कबड्डी, खो-खो स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी विविध स्पर्धा आणि स्नेहभोजन असे या कार्यक्रमाचे स्वरूप असेल.