अबाऊट टर्न: तोडगा

हिमांशू

पावसाळा कुणाला धमकावणी देत असतो तर कुणाला हुलकावणी. पुरात अडकलेल्यांना दुष्काळाच्या आणि दुष्काळात होरपळणाऱ्यांना पुराच्या बातम्या खऱ्या वाटत नाहीत; परंतु या लीला निसर्गाच्या नसून आपल्याच आहेत आणि आपणच आता बदलायला हवं; अन्यथा निसर्ग क्षमा करणार नाही, या विचारापर्यंत बरेच जण आता पोहोचलेत.

तथापि, अज्ञान म्हणा किंवा अंधश्रद्धा, भोळसटपणा म्हणा किंवा हतबलता, पावसासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे “उपाय’ आजही केले जातात. कुठं गाढवाचं लग्न लावलं जातं, तर कुठं बेडकाची पूजा केली जाते. हिरवीगार जंगलं साफ होऊन कॉंक्रीटची जंगलं उभी राहात असताना आर्थिक विकासाचे ढोल वाजवणाऱ्याला किंवा शहरात आपण राहतो तीच इमारत नैसर्गिक जलस्रोतावर अतिक्रमण करून बांधलेली आहे, हे ठाऊक असल्यामुळे गुडघाभर पाण्यातून निमूटपणे रस्ता काढणाऱ्याला भोळसट म्हणावं की हतबल? नाव नसलेली हीच प्रवृत्ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात झिरपू लागली तर व्याकरणातून “कर्ता’ वजाच करावा लागेल आणि “कर्म’ आपला पिच्छा पुरवेल.

हेच पाहा ना, एखाद्या परिसरात गुन्हे अधिक घडू लागले, तर पोलिसांनी काय करणं अपेक्षित असतं? गस्त आणि बंदोबस्त वाढवणं, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणं, रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना तडीपार करणं असे अनेक उपाय योजले जातात. तरीही गुन्हे घडतच राहिले, तर सरकारनं पोलिसांना अधिक मनुष्यबळ आणि संसाधने पुरवणं अपेक्षित असतं.

तमिळनाडूतल्या कोईमतूर जिल्ह्यात कोविलपलयम पोलीस ठाण्यात मात्र वेगळंच चित्र दिसलं. या ठाण्याच्या हद्दीत दर आठवड्याला एक खून पडू लागला. गुन्हेगारीच्या इतर घटनांमध्येही वाढ झाली. वाढते गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश येईना. मग कुठल्याशा “शहाण्या’ व्यक्‍तीनं पोलिसांना सल्ला दिला. दोन बकऱ्यांचा बळी द्या, त्यांचं रक्‍त पोलीस ठाण्याच्या आवारात शिंपडा… ताबडतोब यश मिळेल! तमिळ भाषेत या विधीला “कीडा वेट्टू’ असं नाव दिलं गेलंय. पोलिसांनी एके दिवशी भल्या पहाटे चार वाजता हा “विधी’ पोलीस ठाण्यात पार पाडला. बकऱ्याच्या रक्‍ताचं शिंपण केल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि काही राजकीय कार्यकर्त्यांना मटण वाटण्यात आले.

कार्यकर्त्यांना अशासाठी, की दोन बकरे एका राजकीय पक्षाच्या नेत्यानेच “स्पॉन्सर’ केले होते. आता एवढा मोठा वरदहस्त मिळाल्यावर बिचारे बकरे काय करणार? शिवाय, पोलिसांनी गुन्हेगारांऐवजी आपल्यालाच पकडलं, तर “एफआयआर’ कुठं करायची, हाही प्रश्‍न बकऱ्यांना पडला असेल. बिचारे जीवानिशी गेले, खाकी-खादीची पार्टी झाली आणि गुन्हेगार आणखी निश्‍चिंत झाले. पोलिसांनी आपल्यापुढे हात टेकलेत, ही बातमी समजल्यावर गुन्हेगारांनीही पार्टी केली असेल. आता गुन्हेगार आपोआप शरण येणार, असे वाटून पोलीसही निर्धास्त. एकंदरीत सगळेच खूश… आनंदीआनंद!

आपल्याही राज्यात नागपूर, मुंबई वगैरे संवेदनशील ठिकाणी असाच सर्वमान्य तोडगा काढायला हवा. कारण गुन्हेगारांना वचक बसावा म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावले, तर पोलिसांपेक्षा टीव्ही चॅनेलवाल्यांनाच ते अधिक फायदेशीर ठरले. आता तर “फेशियल रेकग्निशन’ ऊर्फ “एफआर’ हे चेहऱ्यांवरून ओळख पटवणारं तंत्रज्ञान येतंय म्हणे! थोडक्‍यात, मनुष्यबळ वाढत नसले तरी तंत्रबळ वाढतंय. दुसरीकडे, बकरे स्पॉन्सर करणाऱ्यांचे राजकीय बळही मिळतंय. सबब मेंदूतले “तंत्रज्ञान’ कायम ठेवायला काहीच हरकत नाही!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)