“सेट’च्या तारखांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

चुकीच्या तारखांवर विश्‍वास न ठेवण्याचे विद्यापीठाचे आवाहन

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षेच्या चुकीच्या तारखांची पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. विद्यापीठाच्या सेट विभागाने सेट परीक्षांचे कोणतेच नियोजन अद्याप केले नाही. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या तारखा चुकीच्या असून, त्यावर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन सेट विभागाने केले आहे.

सहायक प्राध्यापकांसाठी सेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. दि. 28 जानेवारी रोजी झालेल्या सेट परीक्षेचा निकाल दि. 24 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी पुढील परीक्षा कधी होणार आहेत, त्याबाबत अद्याप काहीच नियोजन सेट विभागाने केले नाहीत. मात्र व्हॉट्‌स अॅॅप ग्रुपवरून पुढच्या वर्षात तीन वेळा सेट परीक्षा कोणत्या दिवशी होणार आहेत, त्याचा तारखा प्रसारित होत आहेत. त्याबाबत सेट विभागाकडे विद्यार्थ्यांनी चौकशी केली असता, व्हायरल झालेल्या तारखांत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

सध्या सेट परीक्षांच्या चुकीच्या तारखा प्रसारित होत आहेत. या तारखा पूर्ण चुकीच्या आहेत. सेट विभागाकडून वर्षातून दोन परीक्षा घेतल्या जातात. यात तीन परीक्षांचा तारखानिहाय उल्लेख आहे. एवढेच नव्हे तर सेट परीक्षा तीनशे गुणांचे असतात. यात पाच तासांचा परीक्षांचा कालावधी देण्यात आला. यावरून सध्या व्हायरल होणारा मजकूर चुकीचा असून, त्यावर विश्‍वास ठेवू नये. सेटची पुढील परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्याचे विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

– बी. पी. कापडणीस, सेट विभागाचे समन्वयक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)