238 कोटींचा कर्जनिधी थकीत
संगनमताने गैरविनियोग, अपहार केल्याचा आरोप
बनावट व खोटी कागदपत्रे तयार करुन कर्ज मंजुरी
पिंपरी – दि सेवा विकास सहकारी बॅंकेच्या अधिकारी, पदाधिकारी व काही कर्जदारांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमताने बॅंकेच्या पैशांचा गैरविनियोग आणि अपहार केल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला असून यामुळे बॅंकेचा तब्बल 238 कोटीचा कर्जनिधी थकीत असल्याचे म्हटले आहे.
याप्रकरणी धनराज नथुराम आसवानी (वय 58, रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2010 ते वर्ष 2019 दरम्यान समूह व वैयक्तिक कर्जदार यांनी नियमित कर्ज परतफेड केली नाही. बॅंकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी देखील कर्जदारांची निवड, सुयोग्य कर्ज मंजुरी, वितरण प्रक्रिया व मंजुरी पश्चात कर्ज निधीचा विनियोग इत्यादी बाबींवर रिझर्व्ह बॅंकेच्या परिपत्रकीय निदेर्शांचे उल्लंघन करून जाणीवपूर्वक अयोग्य नियंत्रण राखले. त्यामुळे 238 कोटींचा कर्जनिधी थकीत होऊन संबंधित कर्जदाराकडे असुरक्षितरित्या बिनव्याजी अडकून पडलेला आहे. परिणामी भागधारकांना तीन वर्षांपासून लाभांशाची रक्कम मिळालेली नाही. तसेच बॅंकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी बनावट व खोटे कागदपत्रे तयार करुन विविध कर्ज मंजूर करुन गैरव्यवहार केला आहे.