गंभीर आजारपण म्हणजे सगळं संपले असे नाही 

जयेश राणे   

कॅन्सर, हृदयरोग, किडनी फेल आदी आजारांमुळे त्रस्त असण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यातून गरीब-श्रीमंत कोणीही सुटलेला नाही. अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने पुन्हा सिनेजगतात पदार्पण केले आहे. अमेरिकेत उपचार घेत कॅन्सरसारख्या प्राणघातकी आजाराशी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर दिलेली झुंज लक्षवेधी आहे. एक जीवघेणा आजार ते पुन्हा कलाक्षेत्रात पदार्पण हा प्रवास त्या अभिनेत्रीसह अनेकांना खूप काही आवश्‍यक गोष्टी शिकवणारा आहे. अर्थातच त्यासाठी शिकण्याची इच्छाशक्ती जागृत ठेवणे महत्वाचे आहे. आजार जडल्यावर त्यामुळे त्या व्यक्तीसह कुटुंबियांनाही चिंता वाटणे साहजिकच असते. कुटुंबातील एक व्यक्ती जरी आजारी असली, तरी संपूर्ण कुटुंबाची घडी विस्कळीत होते. अंधारानंतर उजेड हा पडतोच. हे प्रतिदिन अनुभवले जाते. प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार असतात. त्यांची तीव्रता कमी अधिक प्रमाणात असते.

सोनालीने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत सेटवर परतल्यावर तिला नेमके काय वाटले याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी माझा आनंद शब्दात व्यक्त करु शकत नाही. बऱ्याच काळानंतर पुन्हा काम सुरु करणे आणि कॅमेऱ्याला सामोरे जाणे हा एक सुंदर अनुभव आहे,’ असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. अमेरिकेत उपचार घेत असतानाही ती सोशल मीडियावर सक्रिय होती. आजाराने खचून न जाता नेहमी सकारात्मक विचार आपल्या पोस्टमधून मांडणारी सोनाली इतर लोकांसाठी उत्तम उदाहरण ठरली. तिला “हाय ग्रेड मेटास्टेटिक कॅन्सर’चे निदान झाल्याचंही तिने इंस्टाग्रामवरुन आपल्या चाहत्यांना सांगितलं होत.

क्रिकेटपटू युवराज सिंह यालाही कॅन्सर झाला होता. त्यानेही त्याच्याशी निकराची झुंज देत आजारालाही पळवून लावले. अशी अनेक उदाहरणे क्रीडा, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींविषयी देता येतील. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे ही रपलीशरींळल रळश्राशपीं या गंभीर आजाराने आजारी आहेत. गेल्या फेब्रुवारीमध्ये याचे निदान झाले होते. अत्यंत कठीण शारीरिक स्थितीतही ते गंभीर आजाराशी लढत आहेत. त्या स्थितीतही त्यांनी गोवा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी उपस्थिती लावली. देशातील अनेक वर्तमानपत्रांत त्यांचे गोवा विधानसभेत अर्थसंकल्पावेळीचे छायाचित्र प्रसिध्द झाले आहे. आजारी आहे म्हणून आराम करण्याची सवलत न घेता सतत कार्यरत राहण्याचा त्यांचा बाणा युवा पिढीसही लाजवेल असा आहे.

“मी आजारी आहे, आता माझे आणि कुटुंबाचे कसे होणार?’ या विचारांपासून स्वतःला दूर ठेवण्याचे उत्तम औषध म्हणजे पुरेसा आराम केल्यावर लगेचच स्वतःला विविध कामांत व्यस्त ठेवणे होय. हेच गंभीर आजाराशी लढणाऱ्या बड्या मंडळींनी केले आहे. त्यामुळे काम हेच जणू त्यांच्यासाठी औषधाप्रमाणे काम करते, असे म्हणता येईल. आजारातून बाहेर येण्यासाठी औषधोपचार घ्यावे लागतात.

काहीप्रसंगी काही विशिष्ट उपचार पद्धतींतूनही जावे लागते. त्यामुळे व्यक्तीची शारीरिक स्थिती खालावते. त्यातून पुन्हा पूर्ववत स्थितीवर येण्यासाठी काही कालावधी निश्‍चित लागतो. तोपर्यंतचा प्रवास हा पुष्कळ वेदनादायीच असतो. सोनं हे तावून सुलाखून निघते तेव्हा त्याला झळाळी येते. त्यामुळे आजाराशी दोन हात करून आपल्याला काहीही झालेले नाही. याप्रमाणे वावरणाऱ्या व्यक्तींना किती कठीण अनुभवांची शिदोरी मिळालेली असते याची कल्पनाच केलेली बरी.
देशातील लोकांवर कला आणि क्रिकेटसारख्या क्षेत्रातील मंडळींचा जबरदस्त पगडा आहे. त्या त्या क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्तीविषयी त्याच्या चाहत्यांना खडाणखडा माहिती असते. एकप्रकारे त्यांचा बायोडेटाच तोंडपाठ असतो असे म्हणता येईल.

माझ्याच परिचयातील एका तिशीतील युवकाचे किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन झाले आहे. त्याला आलेल्या डेंग्यूसारख्या जीवघेण्या तापामुळे त्याच्या किडन्या निकामी झाल्या. त्याला अडीच वर्षे डायलिसीसवर काढावी लागली. कारण दरम्यानच्या कालावधीत त्याला कावीळ झाल्याने ऑपरेशन करणे शक्‍य नव्हते. कावीळमधून पूर्णपणे बाहेर आल्यावर किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन यशस्वीपणे पार पडले. त्या घटनेला 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. अर्थातच उदरनिर्वाहासाठी नोकरी-व्यवसाय करावा लागतो. त्यासाठी ती व्यक्तीही धावपळ करत आहे.

आजारपणात 4 वर्षे गेली. पूर्वी नोकरी करत असलेल्या ठिकाणी भयंकर जाच असल्याने त्याने ती सोडून दिली. कारण जिथे माणसाकडे माणूस म्हणून पाहिले जात नाही. त्याच्याकडे केवळ यंत्र म्हणूनच पाहिले जाते. तिथे मन मारून किती दिवस काढणार? “कामातील आनंदच घेता येत नसेल, तर असे काम कामाचे नसून ते बिनकामाचे असते’, असे त्याचे मत बनले आहे. नोकरीसाठी आटापिटा करत असूनही नोकरी मिळत नसली तरी त्याने जिद्द सोडलेली नाही. यात विशेष म्हणजे, किडनी ट्रान्सप्लांट झाले असल्याचे कळल्यावर त्याला मुलाखतीसाठीही बोलावणे कंपन्यांनी टाळले. हे तर किती दुर्दैवी आहे!

आपण समाजामध्ये बड्या मंडळींच्या आजारपणाची उदाहरणे केवळ ऐकतो, वाचतो आणि सोडून देतो. याच पठडीतील हा प्रकार म्हणावा लागेल. जेव्हा एक कंपनी म्हणून आपल्याला जेव्हा गंभीर आजाराशी लढून त्यातून बाहेर आलेल्या व्यक्तीला संधी द्यावीशी वाटत नाही तेव्हा आपण त्या उदाहरणांतून काय शिकलो ? असा प्रश्‍न पडतो. हाताची पाचही बोटे सारखी नसतात. कोणावर कोणती वेळ कधी येईल हे सांगणे अशक्‍य असते. कठीण काळातून बाहेर आलेल्या व्यक्तीकडे गंभीर आजाराशी कसे लढावे याची शिदोरी त्याच्यासह असते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक झालेला असतो. विचारांत अधिक परिपक्वता आलेली असते. कारण अनेक कठीण प्रसंगांचे चक्रव्यूह त्याने भेदलेले असतात.

आयुष्य म्हणजे एक चक्रव्यूहच आहे. त्यातून जाताना चांगले-वाईट प्रसंग घडत असतात. दोन्ही प्रसंग पुष्कळ गोष्टी शिकवून जातात. क्रिकेटपटू युवराज सिंग याला कॅन्सरमधून बाहेर आल्यावर भारतीय क्रिकेट मंडळाने पुष्कळ संधी दिल्या त्याने त्याच्या परीने त्याचे चीजही केले. ती व्यक्ती आजारातून बाहेर आली आहे म्हणून त्याला संधी द्यावी का ? की न द्यावी ? या विवंचनेत क्रिकेट मंडळ राहिले नाही आणि त्यांनी त्याला संधी दिली. यानंतर त्याचा विवाहही थाटामाटात पार पडला.
समाज, औद्योगिक क्षेत्र यांनी आजाराशी लढणाऱ्या, त्यातून बाहेर आलेल्या व्यक्तींनाही प्रवाहात आणण्यासाठी व्यापक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. तरच समाजातील त्या घटकांनाही आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)