सासू-सासऱ्यापासून पतीला वेगळे करणे क्रूरताच… (भाग-२)

सासू-सासऱ्यापासून पतीला वेगळे करणे क्रूरताच… (भाग-१)

सन 2012 साली ती पत्नी सर्व दागिने घेऊन घरातून माहेरी निघून गेली. त्यामुळे पतीने हिंदू विवाह कायद्यानुसार वैवाहिक संबंध पुनर्स्थापनेसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्नीने कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत कलम 498 अ नुसार तसेच भारतीय दंडसहिता कलम 406 व 34 नुसार पतीसह कुटुंबीयांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्या खटल्यात दोघांत तडजोड होऊन पत्नीच्या इच्छेनुसार हरीद्वारला वेगळे घर भाडोत्री घेऊन राहू लागले. तेथे मुलाचा वाढदिवस वगैरे छान कार्यक्रम पतीने केला. त्यानंतर पुन्हा आपण दिल्लीत राहू अशी मागणी करीत पतीला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यानंतर 10 लाख रुपयांची मागणी करीत तिने संमतीने घटस्फोट घेण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर तिने 2012 ला पुन्हा सर्व दागिन्यासह तेही घर सोडले. त्यामुळे पतीने तिच्याविरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. मात्र, कुटुंब न्यायालयाने एक 2012 पासून 2013 पर्यंत पत्नीला विभक्‍त राहून एकच वर्ष झाल्याने व विवाह कायद्यानुसार दोन वर्षे विभक्‍त असल्याशिवाय घटस्फोट मिळू शकत नाही, या कारणाने पतीचा घटस्फोट अर्ज फेटाळला. त्यावर नाराज होत पती शिनू महेंद्रू यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल करून घटस्फोटाचा अर्ज मंजूर करण्याची मागणी केली.

उच्च न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून सदर निर्णय रद्दबातल ठरवीत जरी पतीच्या अर्जाला वेगळे राहिल्यापासून दोन वर्षे झाली नसली तरी पत्नीने पतीविरुद्ध केलेली खोटी तक्रार, वयस्कर आजारी आईपासून मुलानेच नाही तर सुनेनेसुद्धा वेगळे राहता कामा नये याबाबीचा विचार कुटुंब न्यायालयाने केला नाही, अशी टिप्पणी दिली. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने समर घोष विरुद्ध जया घोष (2007) 4 एस सी सी, 511 या खटल्यात मानसिक क्रूरतेमधध्ये येणाऱ्या बाबी सांगितल्याचे स्पष्ट केले आहे. अशा मानसिक वेदना ज्यामुळे पती-पत्नीला एकत्र संसार करणे अशक्‍य आहे, एखाद्या जोडीदाराला शारीरिक व मानसिक त्रास देणे, ज्यामुळे त्याला जगणे भितीदायक ठरेल अशा बाबी मानसिक क्रूरतेत येतात हे स्पष्ट केले आहे. तसेच श्रीमती संतना बॅनर्जी विरुद्ध सचिंद्रनाथ बॅनर्जी ए. आय.आर.1990 ( कलकत्ता )367 मध्ये देखील एखाद्या जोडीदाराने केलेली अपमानास्पद वागणूक व अनादर देखील मानसिक क्रूरतेत येतो. तसेच हरभजन सिंग मोंगा विरुद्ध अमरजीत कौर, ए आय आर 1986 एम. पी. 41 या खटल्यात देखील आत्महत्येची धमकी देऊन पतीला त्रास दिला व खोट्या तक्रारीची भीतीदेखील मानसिक क्रूरतेच्या व्याख्येत येते, असे स्पष्ट केले.

शिनू महेंद्रच्या या खटल्यात पत्नी संगीता हिने सासूच्या व्यंगावर टिप्पणी करीत तिच्यापासून पतीला वेगळे राहण्यास प्रवृत्त केले, तसेच पतीचा आत्महत्येची धमकीसह वेळोवेळी अपमान, अनादर यामुळे पत्नीने पतीला क्रूरतेची वागणूक दिली, हे स्पष्ट झाले त्यामुळे पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर करीत कुटुंब न्यायालयाचा निकाल रद्द केला. एकूणच घटस्फोटासाठीची मानसिक क्रूरतेची व्याख्या या निकालाने स्पष्ट केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)