सोलापूर – सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या पांडूरंग वस्ती येथे मृतदेहाचे बारीक-बारीक तुकडे केलेले पोते बुधवारी आढळून आले. गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या एका वकिलाचा शोध घेताना पोलिसांच्या हाती हे पोते सापडले. या घटनेने सोलापूरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना बुधवारी सकाळी साडे बाराच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी प्राथमिक दिलेली माहिती अशी की, पांडूरंग वस्ती येथे एका व्यक्तीचे गेल्या पाच दिवसांपासून घर बंद होते. घरातून दुर्गंधी येत असतानाही आजुबाजुच्या लोकांनी याबाबत कुठलेही तक्रार पोलिसांकडे केली नाही. दरम्यान, मंगळवारी ऍड. राजेश कांबळे हे गायब असल्याची तक्रार सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने सोलापूर आयुक्तालयात देण्यात आली.
या तक्रारीवरून पोलीसांनी बुधवारी सकाळी बाराच्या सुमारास पांडूरंग वस्ती येथील बंटी खरटमल यांच्या घराची तपासणी केली. यावेळी सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी घराची संपूर्ण पाहणी केली असता घरात प्रेताचे तुकडे भरून ठेवलेले पोते आढळून आले. पोलिसांनी पोत्यात ठेवलेले प्रेत ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात पाठविले आहे.