ज्येष्ठ पत्रकार, क्रीडासंघटक प्रल्हाद सावंत यांचे निधन 

ऍथलेटिक्‍स क्षेत्रावर शोककळा 
पुणे: पुण्यातील ज्येष्ठ क्रीडासंघटक व माजी क्रीडापत्रकार प्रल्हाद सावंत यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. ते 69 वर्षांचे होते.
नू.म.वि. प्रशाला आणि स. प. महाविद्यालय येथे शिक्षण घेतल्यानंतर सावंत यांनी 30 वर्षांपेक्षा अधिक काळ क्रीडा पत्रकार म्हणून काम केले. सावंत यांनी सात ऑलिम्पिक स्पर्धा, तसेच अनेक आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धांचे वृत्तांकन केले होते. सावंत यांनी पुणे मॅरेथॉन ट्रस्टच्या माध्यमातून क्रीडाक्षेत्राची सुमारे तीन दशकांपेक्षा अधिक काळ सेवा केली. पहिल्या वर्षापासून गेल्या वर्षापर्यंत सर्व 32 पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या संयोजनात त्यांचा मोलाचा वाटा होता.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष, राष्ट्रीय ऍथलेटिक्‍स संघटनेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र ऍथलेटिक्‍स संघटनेचे महासचिव अशा विविध पदांवर दीर्घकाळ कार्यरत असलेल्या सावंत यांनी खेळ व खेळाडूंसाठी मोलाचे कार्य केले. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील ऍथलेटिक्‍स स्पर्धांचे संयोजन, खेळाडूंची निवड व संघटनात्मक कामात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला.
दिल्ली आशियाई स्पर्धा व पुण्यातील युवा राष्ट्रकुल स्पर्धांच्या संयोजनातही त्यांचा मोलाचा वाटा होता. सावंत यांना 1990 मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यांना क्रीडा पत्रकारितेसाठी राज्य शासनाचा कै. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार व कै. नानासाहेब परुळेकर पुरस्कारही देण्यात आला होता. सावंत यांच्या निधनामुळे ऍथलेटिक्‍स क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)