तासवडे टोलनाक्‍यावर निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री

महामार्गालगत नाल्याच्या ठिकाणी काकड्यांची साठवणूक; प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ
मोहसीन संदे
कोपर्डेहवेली – कराड-सातारा महामार्गावरील तासवडे टोलनाक्‍यावर निकृष्ट पद्धतीने साठवलेल्या अन्न पदार्थांची विक्री करण्यात येत आहे. एका विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेली काकडी चक्‍क महामार्गालगत असलेल्या नाल्याच्या ठिकाणी साठवून ठेवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. अशा विक्रेत्यांवर अन्न-भेसळ विभागाने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

प्रवासी ग्राहकांच्या आरोग्याशी राजरोसपणे खेळणाऱ्या अशा विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे असतानाही याकडे अन्न-भेसळ विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्‍त होत केला जात आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावरून दिवसभरात हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. या महामार्गावरील उंब्रजनजीक तासवडे येथे टोलनाका असल्याने तेथे प्रत्येक वाहनधारकाची पाच ते दहा मिनिटे टोलसाठी जातात. याचाच फायदा घेत अनेक किरकोळ खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांनी आपल्या व्यवसायाचे बस्तान बसवले आहे.

अनेकांच्या कुटुंबाचा हाच व्यवसाय उदरनिर्वाहाचे साधन बनला आहे. यामध्ये उंब्रज परिसरातील युवकांची संख्या मोठी आहे. या पदार्थांमध्ये वेफर्स, शेंगदाणे, चिवडा, बॉबी, वडापाव, काकडी, पेरू, पाण्याची बाटली यासारखे अनेक खाद्यपदार्थ घेऊन विक्रेते प्रत्येक वाहनानजीक जाऊन विक्री करताना सर्रास दिसतात. प्रवासादरम्यान फावल्या वेळातील खाऊ म्हणून अनेक प्रवाशी-वाहनधारक असे पदार्थ खरेदी करतात. त्यातूनही तिखट-मीठ लावलेल्या काकडी व पेरूच्या कापांना प्रवाशांकडून मोठी मागणी असते. लहानांच्या तर तो आवडीचा पदार्थ. काही विक्रेते याचाच फायदा उठवत पैसा मिळविण्यासाठी जादा पदार्थांची साठवणूक करून निकृष्ट दर्जाचे पदार्थ ग्राहकांच्या माथी मारत असल्याचे दिसून येत आहे.

असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. दिवसभरात विक्री करून शिल्लक राहिलेली काकडी एका विक्रेत्याने महामार्गालगतच्या उंब्रज बाजूकडील नाल्यामध्ये साठवणूक केल्याचा घृणास्पद प्रकार सोमवारी उघडकीस आला. ही घटना कमी होती, म्हणून की काय अंधारात ठेवलेल्या या काकडीच्या गोणीवर एका प्रवाशाने अजाणतेपणी लघुशंका केल्याचीही चर्चा सर्वत्र पसरली होती. असे खाद्यपदार्थ खाऊन प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण? घडलेल्या घटनेची संबंधित विभागाने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाहनचालक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

गाडीतील प्रवासी खासकरून लहान मुले काकडी, पेरू असे पदार्थ आवडीने खातात. परंतु विक्रेत्यांकडून असे किळसवाणे प्रकार केले जात असतील तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे. लहान मुले व नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांच्या खाद्यपदार्थांवर सर्व प्रवाशांनी बहिष्कार टाकावा. आर्थिक फटका बसल्याशिवाय या विक्रेत्यांना जाग येणार नाही.

किशोर जाधव वाहनधारक प्रवाशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)