चौघांवर गुन्हा दाखल : सव्वा तीन लाखांचा बनावट माल जप्त
पिंपरी – मोबाईलशी संबंधित बनावटी वस्तू आणून त्यांना ऍपल कंपनीचा लोगो वापरून विकणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅटरी, स्क्रीन गार्ड, बॅक कव्हर, डिस्प्ले, हेडफोन या सर्व बनावटी वस्तूंना ऍपल कंपनीचा लोगो लाऊन विकण्याचा गोरखधंदा पिंपरी येथे सुरू होता. पिंपरी पोलिसांनी बुधवारी (दि. 15) चार वाजताच्या सुमारास डिलक्स चौक येथील मॉलमधल्या दुकानात छापा टाकून 3 लाख 25 हजार रुपयांचा बनावटी माल जप्त केला.
वसनाबाई मनकाजी रब्बारी (वय, 20 रा. साईचौक, मूळ रा. गुजरात), मोहबताराम पिराजी चौधरी (वय, 19 रा. पिंपरीगाव), गणेश भगवानरामजी चौधरी (वय, 21 रा. पिंपरी), जामताराम जेठाराम चौधरी (वय, 24 रा. साईचौक, मूळ रा. राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या चौघा आरोपींची नावे आहेत.
आरोपींचे पिंपरीतील डिलक्स चौकातील मॉलमध्ये मोबाईल साहित्यांचे दुकान आहे. या दुकानात आरोपी हे ऍपल आणि इतर बड्या मोबाईल कंपनींचे लोगो वापरून मोबाईल बॅटरी, स्क्रीन गार्ड, बॅक कव्हर, डिस्प्ले, हेडफोन असे बनावट साहित्य विकत असल्याची, माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली होती. यानुसार, पोलिसांना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास दुकानावर धाड टाकली. यामध्ये, पोलिसांना मोबाईलच्या अनेक बनावट वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी ते साहित्य जप्त करुन चौघांवर कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.