कलंदर: आत्मचिंतन!

उत्तम पिंगळे

पाच सुभ्यांतील दारूण पराभवामुळे महाराजांनी सेनापतींना ताबडतोब पाचारण केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराज : यावे सेनापती, केम छे?
सेनापती : (चाचरत) सारू छे.
महाराज : बघा पुन्हा तेच. मी जागतिक इतर साम्राज्यांच्या भेटीवर असताना केव्हाही विचारले की सारू छे, म्हणजे सर्वत्र आलबेल आहे, हेच उत्तर असायचे. आता हे काय? आपले पाच सुभे पडले तरी सारू छे?
सेनापती : महाराज, काही गफलत झाली आहे.
महाराज : आपण एवढे क्रांतिकारी निर्णय घेतले गरीब जनतेसाठी स्वच्छतागृहे, घरे, स्वयंपाकासाठी मायबहिणींना गॅस तसेच गरिबांसाठी अल्प दराने विमा देऊ केला…
सेनापती : महाराज, बहुतेक ठिकाणी गटबाजी!
महाराज : आपण सारवासारव करीत आहात खासगी गुप्तचराने मला व्यवस्थित माहिती दिली आहे. आपण स्वत:ला सुपर महाराज समजत होता, असा आपल्याच पक्षातील मनसबदारांचा व अनेक सुभेप्रमुखांचा आक्षेप आहे. त्यामुळे तुम्ही ज्याला “पप्पू’ म्हणत होता तो “अप्पू’ म्हणून समोर आला आहे.
सेनापती : असं कोण म्हणतो?
महाराज : बघा. मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगत आहे व तुम्ही मलाच उलट प्रश्न विचारात आहात. आपण सेनापती आहात व सेनापती सारखेच राहावे.
सेनापती : क्षमा असावी महाराज.
महाराज : मी विश्वातील विविध साम्राज्यात फिरत होतो आणि येथील अनेक चांगल्या गोष्टी येथे कशा आणता येतील यासाठी प्रयत्न करीत होतो. पण आपण येथे आपली धोरणे तळागाळापर्यंत व्यवस्थित पोहोचवली नाहीत.
सेनापती : तसे नाही महाराज. आम्ही आपला जागतिक पराक्रम सर्वांना सांगत होतो. आपण जी मोहोरा बंदी व एक समान कर लावला या गोष्टी थोडय़ा अडचणीच्या झाल्या पण आम्ही त्या लोकांना नीट समजावल्या. आपल्या साम्राज्यातील शेअर बाजारही त्यामुळे चांगलेच उंचावले आहेत.
महाराज : काय शेअरबाजार? सेनापती, आपल्या साम्राज्यातील प्रत्येक पाच लोकांमध्ये जे शेअरमध्ये पैसे टाकतात त्यातील तीन गुजराती आहेत. मग फायदा झाला तर कोणाला? जास्त गुजराती लोकांनाच ना? तिकडे कांदा दीड रुपयांवर आला तर त्या शेतकऱ्याला शेअर निर्देशांक 35 हजारच्या वर गेला सांगून काय फायदा? त्या गरीब शेतकऱ्यांसाठी आपण काय केले, हे त्याला समजावून सांगायला हवे.
सेनापती : होय महाराज.
महाराज : आपल्या सहकारी मित्रांबरोबर सबुरीने घ्यावे. सत्ता काही एक हाती मिळत नसते. त्या महाराष्ट्र सुभ्यामध्ये कुरबुर चालू आहे तेथे आपले सेनापती चांगले काम करत आहेत. नुकत्याच धुळे, नगर स्थानिक प्रांतात त्यांनी चांगले यश मिळविले आहे. तेथेही धनुर्धारी सहकाऱ्यांशी जमवून घ्यावे. अजून आपणास काय वाटत आहे?
सेनापती : (विचार करत) महाराज . .
महाराजा : बोला. स्पष्ट बोला.. . .
सेनापती : नाही आपण बराच काळ साम्राज्याबाहेर राहाता हा विरोधकांचा आक्षेप आहे. तसेच आपण तडकाफडकी ‘खजिनदार’ बदलला व इतरही स्वायत्त संस्थांमध्ये ढवळाढवळ करत आहात असाही विरोधकांचा आक्षेप आहे.
महाराज : ऐकले आहे आम्ही. आगामी निवडणुकीसाठी आम्ही जास्तीत जास्त आपल्याच साम्राज्यामध्ये राहू. आपल्याच पक्षातील निवृत्त पुढारी यांना पुन्हा पाचारण करा. तसेच आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांनाही बोलावून घ्या. सगळे मतभेद मिटवूया. आपण अजून आपलाच तोरा चालवणार आहात? तसं असेल तर आपण नवीन सेनापती नेमू.
सेनापती : नको नको. सारे मी पाहून घेतो. सर्व जणांना एकत्रित बोलावतो व आगामी निवडणुकीसाठी सर्व मित्रपक्ष आपले सर्व वरिष्ठ सहकारी या सगळ्यांची बैठक बोलावतो. येतो महाराज. (मुजरा करून जातात)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)