सुरक्षा सामान्य माणसांची (भाग-२)

हेमंत महाजन 
ब्रिगेडियर (निवृत्त) 
आपल्यावर अन्याय झाल्याची भावना जेव्हा प्रबळ होते तेव्हा एखादा समाज, संघटना आंदोलनाचे शस्त्र उगारते. बऱ्याचदा अशा आंदोलनांमागे एखादे नेतृत्व असते किंवा काही वेळा उत्स्फूर्तपणेही नागरिक रस्त्यावर उतरतात. मात्र याचवेळी या आंदोलनांच्या मूळ हेतूला अथवा त्यांच्या न्याय्य मागणीला सुरूंग लावण्यासाठी व एकूणच आंदोलन बदनाम करण्यासाठी काही समाजकंटकही टपून बसलेले असतात. त्यांचे बोलविते धनी आणि त्यांना अर्थपुरवठा करणारे पडद्याआडच राहतात. बदनाम मात्र होते ते आंदोलन व न्यायासाठी लढणारा त्यातील सामान्य कार्यकर्ता. शिवाय त्या आंदोलनाची झळ पोहोचते ती त्यांच्यासारख्याच सर्वसामान्यांना. काहींचे आयुष्यच होरपळून निघते… 
प्रशिक्षित पोलिस हे रस्त्यावर हिंसाचाराचा सामना करण्यासाठी उतरु शकतात. अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या सेवेत अशा परिस्थितीला तोंड दिलेले असल्याने या अनुभवी पोलिसांचा वापर आपण का करु शकत नाही. तसेच गुप्तहेर माहिती मिळणे हे देखील महत्त्वाचे आहे. पोलिसांचे गुप्तहेर खाते सध्या पूर्ण यशस्वी होत नाही. त्यामुळे गुप्तहेर खात्याची ताकद वाढवणे आवश्‍यक आहे. त्यामुळे निवृत्त गुप्तहेर अधिकाऱ्यांचा पुन्हा एकदा वापर करु शकतो का यावर विचार करावा.
आज जम्मूकाश्‍मिर, ईशान्य भारतात आणि इतर ठिकाणी देशात गुप्तहेर संस्था काम करतात त्या महिन्यातून एकदा एकत्र येऊन आपल्याकडील माहितीची देवाणघेवाण करतात. त्यात गुप्तहेर खाते, रिसर्च अनालिसिस विंग, सैन्य गुप्तहेर खाते, महसूल, आयकर या विभागांची गुप्तहेर खाती या सर्वच संस्था राज्यात आणि देशातही कार्यरत असतात. प्रत्येक महिन्याला एकत्र येऊन माहितीचे आदानप्रदान केले पाहिजे आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी गुप्तहेर संस्थांना कोणत्या कामाची माहिती काढावी याविषयी मार्गदर्शन करणेही आवश्‍यक आहे.
कुठल्याही हिंसक आंदोलनाची आगाऊ माहिती मिळाली तर त्यातील हिंसाचाराचे प्रमाण कमी करता येईल. त्यामुळे सर्व गुप्तहेर संस्थांची बैठक राज्य, जिल्हा पातळीवर होणे गरजेचे आहे. जेणेकरून स्थानिक पातळीवर पोलिसांना कुठे काही गडबड होणार असेल तर त्याची माहिती कळते. अशा प्रकारच्या बैठका या मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस संचालक आदींनी घेतल्या पाहिजेत. त्यात सर्व संस्थाच्या प्रतिनिधींकडून माहिती घेता येते.
टेक्‍निकल इंटेलिजन्स हे फार महत्त्वाचे आहे कारण संशयित दंगलखोऱांवर इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने लक्ष ठेवणे सोपे जाते. त्याशिवाय राज्यात सीआरपीएफ, बीएसएफ यांची प्रशिक्षण केंद्रे आहेत तसेच गरज भासल्यास गृहमंत्रालयाकडून आपल्याला अर्धसैनिक दले आणता येतात. म्हणून राज्यातील राज्य राखीव दलाबरोबर या अशा प्रकारच्या अर्धसैनिक दलांची मदत घेऊन लवकरच हिंसाचार थांबवला पाहिजे कारण या हिंसाचाराची व्याप्ती राज्यभर पसरलेली असते व अशावेळी पोलिसांची संख्याही कमी पडते.
आज राज्यात सैन्याच्या कॅन्टोन्मेंट आहेत. तिथे सैन्यदेखील आहे. मुंबई, पुणे, भुसावळ, नाशिक अशा ठिकाणी सैन्य आहे. सैन्याचा वापर का केला जाऊ शकत नाही? कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्याचा वापर अनेकदा केला गेला आहे. जाट आणि गुज्जर आंदोलनाच्या वेळी हरियाणा आणि राजस्थान मध्ये पोलिसांकरवी हिंसाचार थांबवता आला नाही तेव्हा सैन्याला पाचारण करण्यात आले होते. म्हणून हिंसाचार अधिक भडकण्याची वाट न पाहता तो नियंत्रित करण्यासाठी कारवाई केली पाहिजे जेणेकरून हिंसाचारात होणारे नुकसान कमी करु शकतो. त्याशिवाय पोलिसांना दंगेखोरांवर काबू करण्यासाठी नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे गरजेचे आहेत. हे तंत्रज्ञान जम्मू काश्‍मिर पोलिस वापरत आहेत. तशी अधुनिक शस्त्रास्त्रे राज्यातल्या पोलिसांना दिल्यास ते दंगलखोरांवर काबू मिळवू शकतात.
सध्या अश्रुधुरांचा वापर केला जातो त्याशिवाय दंगलखोरांवर काबू मिळवण्याचे इतर उपाय आहेत. आंदोलक संघटनेने आंदोलनात झालेले नुकसान भरून देणे न्यायालयाने बंधनकारक केले पाहिजे. जेणेकरून भविष्यातील हिंसाचार, नुकसान टाळण्यास मदत होईल. यात समाज माध्यमे, छापील माध्यमांची भूमिकाही महत्त्वाची आहे.
आंदोलनांचे वार्तांकन करताना योग्य भूमिका निभावली पाहिजे. हिंसाचाराला महत्त्व न देता वार्तांकन केले जावे. हिंसक आंदोलनांला अनेक संस्था आर्थिक मदत करतात त्यांच्यावरही कारवाई करावी. जसे राष्ट्रीय गुप्तहेर संस्था हुरियत कॉन्फरन्सच्या आर्थिक नाड्या आवळते आहे तशाच पद्धतीने या आंदोलकांच्या आर्थिक नाड्या आवळल्या पाहिजेत. त्यासाठी एखादी मोहिम हाती घेतली पाहिजे.
स्थानिक नागरिकांना माहिती देण्यासाठी एक फोन क्रमांक दिला पाहिजे. जेणेकरून सामान्य नागरिक त्यांच्याकडील माहिती योग्य पद्धतीने योग्य पोलिसांपर्यंत पोहोचवू शकतात. त्यांच्या नावाची गुप्तता बाळगली पाहिजे. मोबाईल फोन वरून हिंसक घटनेचे चित्रण करुन पोलिसांकडे पाठवले पाहिजे. जेणेकरुन हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल. त्यामुळे पोलिस सामान्य नागरिकांची सुरक्षा करु शकतात. हिंसक आंदोलक आंदोलनाचे विविध मार्ग अनुसरतात पोलिसांनीही एक पाऊल पुढे जाऊन हा हिंसाचार थांबवला पाहिजे. सामान्य माणसांनीही पोलिसांना सहकार्य केले पाहिजे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)