मार्केट यार्डात दुय्यम दर्जाचा शेतमाल

बाजार समिती आवाराबाहेर नियमनमुक्ती केल्याचा परिणाम


व्यापारी, मॉलधारक करतायेत थेट शेतातून मालाची खरेदी

पुणे – बाजार समिती आवाराच्या बाहेर नियममुक्ती आहे. त्यामुळे बाहेर खरेदी-विक्री करण्यासाठी कोणताच कर लागत नाही. परिणामी, मार्केट यार्डाऐवजी थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची पद्धत रूढ होत आहे. शहरातील मोठे व्यापारी तसेच मॉलधारक शेतात जाऊन उत्कृष्ट शेतमालाची खरेदी करतात. त्यानंतर राहिलेला माल शेतकऱ्यांकडून बाजारात पाठवून दिला जात आहे. त्यामुळे, गुलटेकडी मार्केटयार्डात दुय्यम दर्जाचा माल येण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

शेतात उत्कृष्ट दर्जाचा माल खरेदी केला जातो. ज्याचा व्यापाऱ्याला फायदा होतो. स्वस्तात माल मिळतो. तोच माल, व्यापारी चढ्या भावाने शहर, उपनगरातील बाजारपेठेत विकत असतात. विशेष म्हणजे दर्जा चांगला असल्याने ग्राहकही दोन पैसे जास्त देऊन तो माल खरेदी करतो. दुसरीकडे शेतकऱ्याला त्याचा फायदा होत आहे. माल तोडून विक्रीसाठी बाजारात आणण्यची गरज नाही. वाहतुक खर्च, हमाली भरावी लागत नाही. तसेच, माल बाजार समितीच्या आवारात आणल्यास त्यावर सेस भरावा लागतो. त्यामुळे त्याची किंमत वाढते. पूर्वी शेतकरी सेस भरायचे. मात्र, आता खरेदीदारांकडून सेस आकारण्यात येतो. परिणामी, खरेदीदारांना उत्कृष्ट दर्जाच्या मालाच्या तुलनेत बाजार आवारातील माल महाग ठरतो. त्याचा दर्जाही कमी असतो. समजा, बाजारात जरी दर्जेदार मालाची आवक झाली. तरी तो माल बाहेर मिळणाऱ्या किंमतीपेक्षा महाग असतो. परिणामी, दर्जा चांगला असूनही त्याला अपेक्षित गिऱ्हाईक मिळत नाही. त्यातच शेतकऱ्यांचा माल विकताना कमिशन मिळणे बंद झाल्याने व्यापारीही आता स्वत:च्या जबाबदारीवर माल विकण्यास तयार होत नसल्याने बाजारावर मंदीचे सावट आहे.

बाजार समितीच्या आवारात सर्व नियमन सुरू आहे. तर, क्षेत्रात कोणतेही नियमन नाही. त्यामुळे बाजारात होत असलेली आवक मोठी असली, तरी त्यामध्ये दर्जाहीन मालाचे प्रमाण जास्त आहे. परिणामी, बाजारात काही प्रमाणात मंदीचे सावट आहे. ते दुर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जास्त भाव मिळावा, यासाठी बाजार आवार नियमनमुक्त करावा, अशी आमची मागणी आहे. याबाबत शासनांच्या प्रतिनिधींसोबत अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र, शासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.

– विलास भुजबळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)