दुसरा कसोटी सामना : उपाहारापर्यंतचा खेळ पावसामुळे रद्द 

भारत-इंग्लंड दुसरा कसोटी क्रिकेट सामना 
लंडन: काल रात्रीपासून लंडन शहरात पडत असलेल्या पावसाच्या सरींमुळे भारत व इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ उपाहारापर्यंत सुरूच होऊ शकला नाही. पावसानंतरही ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर असंख्य क्रिकेटशौकिनांनी गर्दी केली होती. परंतु पहिल्या सत्राअखेर तरी त्यांची निराशाच झाली.
पाऊस थांबण्याचे कोणतेही लक्षण नसल्याचे पाहून पंचांनी उपाहाराची वेळ सुमारे अर्धा तास अलीकडे घेतली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उपाहारानंतर पाऊस कमी होण्याची शक्‍यता आहे. लॉर्डस मैदानावरील पाण्याचा निचरा होण्याची यंत्रणा अत्याधुनिक असल्यामुळे पाऊस थांबताच सुमारे अर्ध्या ते पाऊण तासांत खेळ सुरू करता येईल, असा विश्‍वास संयोजकांनी व्यक्‍त केला. परंतु खूपच खाली आलेले काळे ढग आणि अजिबात वारा नसलेले दमट हवामान यामुळे परिस्थितीत इतक्‍या लवकर बदल होण्याची शक्‍यता नसल्याचे जाणकारांनी सांगितले.
हवामान खात्याच्या भाकितानुसार चहापानाच्या वेळेपर्यंत पाऊस थांबू शकतो. त्यामुळे चहापानानंतर खेळ सुरू करून अखेरचे सत्र उशीरापर्यंत चालू ठेवता येईल, अशी आशा संयोजकांना वाटत आहे. पुढच्या तीन दिवसांमध्ये पाऊस फारसा त्रास देणार नाही, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे. परंतु त्याच वेळी सोमवारपर्यंत पावसाच्या सरी अधूनमधून चालूच राहणार असल्यामुळे दुसऱ्या कसोटीत अनेकदा व्यत्यय येण्याची शक्‍यता आहे.
सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे नाणेफेक झालेली नाही. तसेच उभय संघांचे खेळाडू वॉर्मिंग-अपसाठीही बाहेर आलेले नाहीत. इंग्लंडने काल सामन्याच्या पूर्वसंध्येला आपले 12 खेळाडू जाहीर केले होते. त्यानुसार 20 वर्षीय ऑलिव्हर पोप कसोटीत पदार्पण करणार आहे. भारताने अद्याप संघ जाहीर केला नसला, तरी विराट कोहलीने सांगितल्यानुसार भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाज खेळविण्याची शक्‍यता आहे. त्यामध्ये रवींद्र जडेजाचा संघात समावेश होणार की कुलदीप यादवला संधी मिळणार याबद्दल वेगवेगळी मते आहेत. परंतु नव्या परिस्थितीनुसार पावसाळी हवामानामुळे यात बदल होऊ शकतो.
इंग्लंडने बर्मिंगहॅम येथे झालेला पहिला कसोटी सामना 31 धावांनी जिकून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यायालयात हजर राहायचे असल्यामुळे पहिल्या कसोटीतील इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार बेन स्टोक्‍स दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्यामुळे भारताला ही कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. परंतु पावसामुळे ही संधी हिरावली जाण्याचीही शक्‍यता आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)