संपुआची दुसरी टर्म : काँग्रेसचे जोरदार कमबॅक

15 वी लोकसभा : 2009

2009 मध्ये पंधराव्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीला सरकार स्थापन करण्याचे लोकमत मिळाले. मीरा कुमार या लोकसभेच्या अध्यक्षा तर डॉ. मनमोहन सिंग हे दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. या निवडणुकीनंतर पंडित नेहरूनंतर सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान होणारे आणि दहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे डॉ. मनमोहन सिंग हे पहिले व्यक्ती बनले.

पाच टप्प्यात झालेल्या पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकीत सुमारे 57 टक्के मतदान झाले. ही निवडणूक 19,22,23, 30 एप्रिल आणि 7 आणि 13 मे रोजी पार पडली. निवडणूक आयोगाच्या मते, या निवडणुकीत 71 कोटी 40 लाख मतदार होते. ही संख्या 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 4 कोटी 30 लाखांपेक्षा अधिक होती. या निवडणुकीसाठी आयोगाने 1,120 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी लोकसभेबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम विधानसभेच्या निवडणुका देखील घेण्यात आल्या. 16 मे रोजी मतमोजणी झाली. या निवडणुकीत कॉंग्रेसला 206 जागा मिळाल्या, तर युपीएला तब्बल 262 जागांचे बळ लाभले. सरकार स्थापन करण्यासाठी यूपीएला आणखी काही पक्षाची मदत घ्यावी लागली. भाजपने या निवडणुकीत ज्येष्ठ नेते आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात उपपंतप्रधान राहिलेले लालकृष्ण आडवाणी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून समोर केले होते; मात्र तरीही एनडीएच्या हाती सत्ता लागली नाही. भाजपला 116 जागांवरच समाधान मानावे लागले.

या निवडणुकीत मुलायमसिंह यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाने 23 जागा जिंकून तिसरी मोठी पार्टी असल्याचे सिद्ध केले. बसपाने 21, जेडीयूने 20 जागा मिळवून अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान मिळवले. या निवडणुकीत कॉंग्रेसला सुमारे 28.55 टक्के मत मिळाले आणि ते गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्के अधिक होते. भाजपला या निवडणुकीत सुमारे 3 टक्के मते गमवावी लागली. हे मतदान गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 3.36 टक्के कमीच होते.

या निवडणुकीत तिसरी आघाडी आणि चौथी आघाडीही सहभागी झाली होती. बहुजन समाज पक्ष हा तिसऱ्या आघाडीचा घटक होता. त्यात बीजू जनता दल, जनता दल (एस) यासारख्या पक्षांचा समावेश होता. तर समाजवादी पक्ष हा चौथ्या आघाडीत होता. या आघाडीत लालूप्रसाद यादव यांच्या राजदचा आणि पासवान यांच्या लोकशक्ती पक्षाचा समावेश होता.

2009 च्या निवडणुकांत उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये यूपीएने चांगली कामगिरी केली. या निवडणुकीत तमिळनाडूत जयललिता, आंध्रात महाकुटुमी, केरळ आणि पश्‍चिम बंगालमध्ये डावी आघाडी यांना पराभवाचा सामना करावा लागला.

या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाला 543 पैकी 272 हा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे मागील काळातील आघाडी सरकारांची परंपरा पंधराव्या लोकसभेतही कायम राहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)