युती, आघाडी तर झाली; पण जागा वाटप ठरणार कळीचा मुद्दा

श्रीकृष्ण पादिर/पुणे: काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली, समविचारी पक्षांनाही सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. तर तिकडे हा-नाही म्हणता म्हणता युतीचे घोडे गंगेत न्हाले. आघाडी व युतीने कोण किती जागा लढवणार याबाबतही काही प्रमाणात निश्‍चिती केली, त्यात घटक पक्षांनाही काही जागा द्यायच्या आहेत. मात्र असे असले तरी 2014ची निवडणूक पाहता त्यावेळी सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्याने कोणी कोणत्या जागा लढवायच्या याबाबत एकमत होणे कठीण जाणार आहे. युती आघाडीमुळे काही विद्यमान आमदारांनाही बसावे लागणार असल्याने जागावाटप हा मुद्दा युती आणि आघाडीसाठी कळीचा मुद्दी बनणार हे नक्की!

विधानसभा निवडणुकांसाठी पुणे जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दहा मतदारसंघ आहेत. 2014मध्ये भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे स्वबळावर लढले होते. त्यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादीला सर्वांधिक तीन भाजप, शिवसेनेला प्रत्येकी दोन तर कॉंग्रेस, मनसे व रासपला प्रत्येकी एका जागेवर यश मिळाले. अता आधाडी अन्‌ युती झाल्यामुळे चित्र बदलणार आहे. 2009चा विचार करता आघाडी व युतीचे उमेदवार त्यावेळी लढवलेल्या मतदारसंघावर ठाम आहेत. तर जेथे सध्याचे आमदार आपापला मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे गळ घालून आहेत. तिकिट न मिळाल्यास काहींनी प्रसंगी पक्ष बदलण्याची अथवा अपक्ष लढण्याची तयारीही ठेवली असल्याचे काहींनी खासगीत बोलून दाखवले आहे. याचाच अर्थ बंडखोरी होण्याची शक्‍यता यामुळे वाढली आहे. याचा धोका आघाडीबरोबरच युतीलाही बसणार आहे. युती होणारच नाही, अशी भावना शिवसैनिकांत जास्त असल्याने अन्‌ भाजपलाही कोणी कमी लेखू नये असा त्यांचा रुबाब (सत्तेत असल्याने) सर्वच मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात इच्छुकांनी लढण्याची तयारी केली होती. त्यामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले जाणार आहे. अर्थात जागावाटप करताना 2009चा फॉम्युला कायम राहणार नसला तरी जागा कमी होणार असल्याने पक्षश्रेष्ठीचा आदेश मानायचा की स्वतःला सिद्ध करायचे किंवा मैत्रिपूर्ण लढत द्यायची हे प्रत्यक्ष वेळ आल्यावरच समजेल.

 इंदापुरात अडचण

आघाडीमध्ये इंदापूरची जागा ही वर्षानुवर्षे कॉंग्रेसने लढवली व त्यावर विजयही मिळवला. मात्र गेल्यावेळी येथून राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी कॉंग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करीत आमदारकी मिळवली. आता प्रश्‍न 2019च्या निवडणुकीचा आहे. आघाडीच्या धर्मानुसार ही जागा कॉंग्रेसला मिळणार असल्याचे संकेत आहेत. परंतु आमदार भरणे यांचा कामाचा धडाका पाहता यावेळीही ते निवडुकीत नक्कीच उतरतील. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही त्यांना पाठिंबा आहे. मात्र शरद पवार यांचा निर्णय येथे अंतिम असणार आहे. त्यामुळे भरणे यांना एकतर शांत बसावे लागेल, अन्यथा स्वबळ दाखवून अपक्ष किंवा इतर पक्षातून लढावे लागेल.

जुन्नरमध्ये गटबाजीचे राजकारण

जुन्नरमध्ये जागावाटपाची अडचण नसली तरी 2014ला दोघांच्या भांडणात तिसऱ्याच पक्षाचा उमेदवार निवडून आला. येथे पारंपरिकपणे राष्ट्रवादी व शिवसेना हे दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकतात. इतिहास पाहता दोन्ही पक्षांना येथे यश मिळाले आहे. मात्र दोन्ही पक्षांत गटबाजीचे राजकारण अन्‌ मिळत नसलेली मित्रपक्षाची साथ यामुळे जुन्नरकरांनी 2014ला तिसरा पर्याय निवडला. आताची परिस्थिती पाहता राष्ट्रवादीचा उमेदवार निश्‍चित असला तरी शिवसेना सलग तीनदा पराभूत झाल्याने आता पुन्हा त्याच उमेदवारावर विसंबून राहायचे की नवा उमेदवार उभा करायचा यावर पक्षश्रेष्ठींना जुन्या-नव्यांना सोबत घेऊन पुढील चाल खेळावी लागणार आहे.

खेड, आंबेगावात संमिश्र परिस्थिती

खेड, आंबेगावातही प्रमुख लढत ही शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये होणार आहे. येथे जागा वाटपाबाबत मतभेद नसले तरी आंबेगावात राष्ट्रवादी कॉंगेसचे दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून कोण? हा प्रश्‍न आहे. दुसरीकडे भाजपने या मतदारसंघात बाळसे धरले असल्याने व शिवसेनेला येथे एकदाही यश मिळाले नसल्याने हा मतदारसंघ भाजपकडे घ्यावा, असा होराही तालुकाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा आहे. तर खेडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये काहीशी धूसफूस आहे. येथे भाजपची ताकद भूमिका महत्त्वाची असली तरी वरिष्ठांचा निर्णय मानणारे येथे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत.

शिरूर-हवेलीत शिवसेनेचा दावा

शिरूर-हवेलीत सध्या भाजपचा आमदार आहे. याआधी राष्ट्रवादीने येथे यश मिळवले आहे. मतदारसंघ दोन तालुक्‍यात विभागला असल्याने येथे राष्ट्रवादीला बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो तर या मतदारसंघात शिवसेनचीही ताकद असल्याने युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेने घ्यावा अशी हवेलीतील काही कार्यकर्त्यांची मागणी आहे.

पुरंदरमध्ये आघाडीत रस्सीखेच

पुरंदरमध्ये आमदार शिवसेनेनचे असले तरी हा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी दोघेही प्रयत्नशील आहेत. आघाडीत राष्ट्रवादीकडे असलेल्या या मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून कॉंग्रेसचीही मोठी ताकद वाढलेली आहे.

दौंड मित्रपक्षालाच

दौंडमध्ये मूळतः राष्ट्रवादीमध्येच लढत होत असते. येथे युतीची जागा ही मित्रपक्षाला तर आघाडीची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला आहे. येथे एकदा निवडून आलेला आमदार दुसऱ्यांदा आमदार होत नाही अशा इतिहास असला तरी इतिहरस बदलता येऊ शकतो हेही अनेकदा सिद्ध झाले आहे.

भोर-वेल्हे-मुळशीत सेना-कॉंग्रेस आमने-सामने

भौगोलिकदृष्ट्य हा मतदारसंघ मोठा असून यात तीन तालुक्‍यांचा समावेश आहे. एखादा अपवाद वगळता येथे कॉंग्रेसने आला बालेकिल्ला राखलेला आहे. याआधी मुळशी स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ असताना येथे शिवसेनेचा आमदार होता. आताही शिवसेना प्रयत्नयशील आहे. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या मतदारसंघासाठी आग्रही असले तरी लोकसभेचे हीत लक्षात घेता त्यांना आघाडीचा धर्म पाळावा लागणार आहे.

मावळात सुंदोपसुंदी

मावळ तालुक्‍यात भाजपची ताकद मोठी आहे. मात्र येथे अंतर्गत एकमेकांना मोठा विरोध आहे. आमदार असूनही त्यांना मागील काही निवडणुकांत अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यामुळे शिवसेना येथे प्रयत्नशशील आहे. हा मतदारसंघ भाजपकडे असला तरी लोकसभेत पिंपरी-चिंचवडचा समावेश असल्याने येथे युतीच्या जागावाटपात अदला-बदल झाल्यास आश्‍चर्य वाटू नये. शिवाय कॉंग्रेसनेही पुन्हा आपली ताकद वाढवल्याने व राष्ट्रवादीला एकदाही येथे यश न मिळाल्याने आघाडीतही त्यांच्यातही अदलाबदलीची शक्‍यता नाकारता येत नाही.
फोटो ः युती व आघाडीच्या पक्षचिन्हांचा वापरावा

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)