बंगळूर – कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) या मित्रपक्षांमध्ये बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार त्या राज्यातील 28 पैकी 20 जागा कॉंग्रेस तर 8 जागा जेडीएस लढवणार आहे. जेडीएसने आधी 12 जागा वाट्याला येण्याची मागणी केली होती. मात्र, तो पक्ष कमी जागांवर राजी झाल्याचे समझोत्यामुळे स्पष्ट झाले.
केरळच्या कोचीमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि जेडीएसच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत जागावाटपाला अंतिम रूप देण्यात आले. कर्नाटकमध्ये कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार सत्तेवर आहे. त्या सत्तावाटपानुसार मुख्यमंत्रिपद जेडीएसला देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेत जेडीएसला तर लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात कॉंग्रेसला झुकते माप असा समतोल साधण्यात आल्याचे दिसते.
Ads