समुद्र सपाटीपासूनची उंची आणि भारतीय रेल!

संग्रहित छायाचित्र.....

संख्याशास्त्र, आकडे, फॅक्‍टस ह्या फार मजेदार असू शकतात. त्यातून अनेक सत्यं चटचट कळू शकतात. आता हेच बघा ना. एलेव्हेशन (उत्थान) म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची. तुम्ही कोणत्याही ठिकाणाची भौगोलिक माहिती मिळवत असाल, तर समुद्र सपाटीवरून ते ठिकाण किती उंच आहे, ह्याचा एक आकडा आपल्याला वरचेवर दिसत असतो. साधं रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभं राहून तिथल्या ठिकाणाचा रेल्वेचा बोर्ड नीट वाचला, तरी ते ठिकाण समुद्र सपाटीपासून किती उंच आहे, ते तिथे लिहिलेले असते. एरवी हा आकडा आपण बघतही असतो. परंतु त्यावर विचार करतोच असे नाही!

आता एक गंमत पाहू. आपण ट्रेनने प्रवास करतोय असे समजा. मुंबई-नागपूर! मुंबईतून ट्रेन सुटणार, ती समुद्र सपाटीपासून चौदा मीटर उंचीला. दादरला सात मीटर उंचीवर येणार. इगतपुरीला सर्वात उंच जाणार. जवळपास सहाशे मीटर. कसारा साधारण तीनशे मीटरवर आहे. म्हणजे कसाऱ्याच्या जवळपास दुप्पट उंचीवर ट्रेन चढत जाते इगतपुरीकडे. नासिकला तीच ट्रेन थोडी उताराला लागणार पाचशे साठ मीटरवर. जळगाव समुद्र सपाटीपासून सव्वादोनशे मीटर उंचीवर आहे. अकोल्याला तीच ट्रेन आणखीन उंच चढणार, दोनशे ऐंशी मीटर. तिथून पुढे ट्रेन जाते अमरावतीला. अमरावती समुद्र सपाटीपासून आहे तीनशे चाळीस मीटर उंच. तिथून नागपूरकडे ट्रेन पुन्हा थोडी खाली उतरणार तीस मीटरने. नागपूर समुद्र सपाटीपासून साधारण तीनशे दहा मीटर उंच आहे.

ट्रेनचा प्रवास हा आपल्या कळत नकळत असा खालीवर चढत-उतरत होत राहतो. महाराष्ट्राच्या अंगाखांद्याने जाणारी ही रेल गाडी. ट्रेनचे इतके मोठे धूड चढ उतारावरून खेचून नेणारे तंत्र. काय मस्तं वाटते ह्या मानवी प्रयत्नांबद्दल. विमान उडते तेव्हाही दर वेळी असेच वाटते. सर्वांना लाभ मिळेल असे तंत्र विकसित करणे. आयुष्य सुकर करेल असेही तंत्र असते हे.

तुम्ही रेल्वेशी संबंधित लोकांशी बोला. किती सारे बारकावे ते सहज सांगू शकतात. भारतीय रेलचा मला तर अभिमानच वाटतो. वेगवेगळ्या स्तरांत थोडे तरी अधिकारी असतात, जे कौतुकाची अपेक्षा न ठेवता चांगले काम करायची धडपड करत असतात. आपण फक्त भोकं मोठी करतो. सतत टीकाच करत राहतो. चांगल्या अधिकाऱ्यांचे आभार देखील मानलेच पाहिजेत.

– प्राची पाठक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)