जीवनगाणे: कात्री आणि सुई

अरुण गोखले

“ए मावशी माझ्या शर्टाचं एवढं बटण लावून देतेस का?’ शिवणकाम करीत बसलेल्या नीलामावशीला मोनू म्हणाला.
“हो देते की…. पण तुझं ते तुटलेलं बटण जाग्यावर आहे का? का ते आणायला हवे आहे?’ मावशीने त्याला विचारले.
“हे गं काय मावशी, मी ते तुटलेले बटण सांभाळून ठेवलं आहे.’ असं म्हणत त्याने खिशातच जपून ठेवलेले बटण मावशीच्या हातात दिले. मावशीने त्याचा शर्ट हातात घेतला. बटणाची जागा नीट पाहिली. जवळचा दोरा सुईत ओवून घेतला. चटकन हवा तेवढा दोरा घेऊन एक गाठ मारली अन्‌ जास्तीचा दोरा कात्रीने कापला. बटणाच्या भोकातून खालीवर दोरा खेचून घेत ती बटण लावू लागली.

-Ads-

मोनू मावशीच्या या सर्व कृती अगदी बारकाईने पाहात होता. मावशीने गरजेपुरता कात्रीचा वापर केला आणि ती चटकन आपल्या मांडी खाली ठेवली. बटण शिवलेली सुई मात्र तिने चटकन तिच्या आंबाड्यात खोवली. ही गोष्टही मोनूच्या नजरेतून सुटली नव्हती.

“हं मोनू, हा घे शर्ट,’ असं म्हणत मावशीने शर्ट त्याच्या हातात दिला. तो म्हणाला, “थॅंक्‍यू मावशी.’
मावशी म्हणाली, “अरे गुलामा! बराच शहाणा झालेला दिसतोस की तू?’
त्यावर मोनू म्हणाला, “मावशी! तू रागावर नसशील तर एक विचारू? तू कात्री मांडीखाली ठेवलीस आणि सुई मात्र डोक्‍यावरच्या अंबाड्यात. कात्री पायाशी अन सुई डोक्‍यावर असं का?’
“अच्छा म्हणजे तुला मी कात्री मांडीखाली का ठेवली आणि सुई आंबाड्यात का खोवली याचं कारण हवं आहे का? सांगते हं, आधी तू हे सांग की कात्री काय करते?’
“काय म्हणजे काय! कात्री कापडाचे-कागदाचे तुकडे करते.’
“आणि सुई काय करते?’ “सुई कापलेले कापड, कागद एकत्र जोडते.’
“होय ना! मग आता तूच सांग जास्त महत्त्वाचं काय? तोडायचं? का जोडायचं?’
“अर्थातच जोडायचं,’ मोनू म्हणाला. त्यावर मावशीने खुलासा केला की, “म्हणूनच जी जास्त मोलाची ती वर आणि जी कमी मोलाची ती…’
“खाली…’ असं म्हणत मोनूने मावशीच्या हातावर टाळी दिली. मोनूला तोडण्याचं आणि जोडण्याचं मोल समजलंय या कल्पनेने मावशी सुखावली. हेच असतं ना घरातलं शिक्षण?

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)