विज्ञानविश्‍व : मुळा-मुठा कधी दिसतील अशा…? 

मेघश्री दळवी 

नदी म्हटलं की खळाळतं पाणी, खुला प्रवाह असं काहीसं चित्र डोळ्यासमोर येतं. पण प्रत्यक्षात शहरी भागात अनेक नद्यांचा श्‍वास कोंडत चालला आहे. मिठी, उल्हास अशा नद्यांचं पात्र कमी-कमी होत जाताना आपण पाहिलं आहे. या शहरी नद्या प्रदूषणमुक्‍त करायला हव्यात हा एक मुद्दा आहेच. सोबत त्यांना मुक्‍त वाहू द्या असा विचार आता जगभर पुढे येत आहे.
इंग्लंडमधलं शेफील्ड शहर, डॉन नदी आणि तिच्या चार उपनद्यांच्या खोऱ्यात वसलेलं. पण जसजसा शहराचा विस्तार होत गेला, तसतसा या नद्यांवर बांधकाम वाढत गेलं, त्या आक्रसत गेल्या. शेफील्डच्या मध्यवर्ती भागात तर शेवटी बिचाऱ्यांना जमिनीखाली आसरा घ्यावा लागला. हा दुर्दैवी प्रकार पुण्यासह अनेक महानगरांमध्ये झालेला आहे. मोक्‍याची जागी रस्ते किंवा इमारती बांधण्याला प्राधान्य मिळतं आणि जीव जातो तो नद्यांचा.

माणसांच्या सुरुवातीच्या वस्त्या नद्यांच्या आसपास असायच्या. त्या शेतीप्रधान वस्त्यांना नद्यांचं महत्त्व होतं. आपल्याकडे तर नद्यांची पूजा होते. पण औद्योगिक क्रांतीनंतर शहरं अफाट वाढत गेली. आपल्या वापरासाठी जमीन मिळवताना आपण निसर्गाचं रूप अगदी क्रूरपणे बदलून टाकलं. पण त्याचे परिणाम उलट आपल्यावरच दिसायला लागले. म्हणूनच तर आज शेफील्डमधल्या शीफसारख्या नद्यांना मूळ स्वरूपात आणण्याची धडपड सुरू झाली आहे. या उपक्रमाला नाव आहे “डे-लाइटिंग रिव्हर्स’. नद्यांना प्रकाशात आणण्याच्या या बदलासाठी पुढाकार घेत आहेत पर्यावरणप्रेमी संस्था आणि नगररचनाकार.

नद्यांना पुन्हा खुल्या आकाशाखाली आणणं हे अर्थातच सोपं काम नाही. त्यासाठी जमीन मिळवायला झगडावं लागतं. नदीचं पात्र मोकळं करताना रस्ते, जमिनीलगतच्या केबल्स, वस्ती, कारखाने अशा अनेक इतर बाबी लक्षात घ्याव्या लागतात. मात्र, याचे चांगले परिणाम लगेच दिसायला लागतात. नद्यांचा छोटासा प्रवाह जरी मिळाला तरी तिथे हिरवाई पसरायला लागते. गारवा जाणवतो. झाडंझुडुपं वाढली की प्राणी-पक्षी येऊन रमतात. पाणी स्वच्छ केलं की मासे विहरतात. एक परिसंस्था बहरायला लागते. पावसाच्या पाण्याचा निचरा होतो, हिरवाईमुळे हवेचं प्रदूषण थोडं कमी होतं.

द. कोरियातल्या सेऊलमध्ये चिंगईचेन मुख्य नदी होती. शहर वाढलं तशी ती प्रदूषित होत गेली, घाणीने भरत गेली. पुढे तिच्यावर हायवे बांधण्यात आला आणि ती जणू नाहीशीच झाली. काही वर्षांपूर्वी या नदीचा प्रवाह खुला करण्याला सुरुवात झाली. आता ती मोढ्या दिमाखाने पुन्हा वाहायला लागली आहे. तिच्या बाजूला चालायला छान वाटा, कारंजी आणि बसण्याची व्यवस्था केलेली आहे. शहराच्या गजबजाटाला कंटाळलेल्या माणसांना तिथे आपोआप एक सुखद निवांतपणा मिळतो.

न्यूयॉर्कमधली सॉ मिल नदी, लंडनमधली फ्लीट, ब्रुसेल्समधली सेन्ने, सिडनीमधला टॅंक झरा, मॉस्कोमधली नेग्लीन्या, बीजिंगमधली चॅंगपु, व्हॅकूव्हरमधला हेस्टिंग्ज क्रीक अशा महानगरांमधल्या नद्या गेल्या काही वर्षांत पुन्हा मोकळ्यावर आलेल्या आहेत, स्वच्छ झालेल्या आहेत. त्यांच्या अवतीभवती माणसं हौसेने वावरू लागली आहेत. आपल्याकडे अहमदाबादमध्ये साबरमतीसाठी असे प्रयत्न सफल झालेले दिसतात. निसर्गाविषयी ही जाणीव एकदा रुजली की असे अनेक प्रकल्प उभे राहतील. मलिन शहरी नद्यांना स्वच्छ मुक्‍त असे दिवस दिसतील. पुण्यात मुळा-मुठा नद्या अशा दिसतील का?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)