विज्ञानविश्‍व: द ग्रेट ग्रीन वॉल

प्रातिनिधिक छायाचित्र

डॉ. मेघश्री दळवी

द ग्रेट वॉल म्हटलं की, आपल्याला आठवते ती चीनची भिंत. एक आधुनिक आश्‍चर्य. ती बांधली होती शत्रूला दूर ठेवण्याच्या उद्देशाने. आणखी काही भिंतींची चर्चादेखील घुसखोरीच्या कारणाने होत राहते. पण त्याच वेळी जगात दुसरीकडे खूप चांगल्या उद्देशाने एक भिंत उभी राहते आहे,ती म्हणजे आफ्रिकेची द ग्रेट ग्रीन वॉल. आफ्रिकेच्या उत्तर भागातलं सहारा वाळवंट हे जगातलं सर्वात मोठं कोरडं वाळवंट. नव्वद लाख चौरस किलोमीटरपेक्षा जास्त भाग या वाळवंटाने व्यापलेला आहे. रखरखीत अशा सहारामध्ये पाऊस अगदी थोडासा पडतो आणि काही भागात तर गेली कित्येक वर्षं पावसाचा थेंब नाही. अशा कोरड्या प्रदेशातही काही झाडंझुडपं वाढतात. पण जमिनीची धूप थांबवण्यात ती कमी पडतात.

याचा परिणाम म्हणून सहारा गेली काही वर्षं दक्षिणेकडे पसरायला लागलं आहे. अलीकडेच केलेल्या एका पाहणीनुसार 1920 ते 2018 या काळात हे वाळवंट दहा टक्‍क्‍यांनी वाढलं. एरव्हीही आपण पर्यावरणातले धोकादायक बदल पाहतो आहोत. त्यात ही भर. म्हणूनच या वाळवंटीकरणाचा परिणाम कमी करण्यासाठी ही द ग्रेट ग्रीन वॉलची कल्पना पुढे आली. त्यावेळी सहाराच्या पसरण्याचं अचूक मोजमाप झालं नव्हतं, पण त्याची झळ जाणवायला लागली होती. सहाराच्या सीमेवर असलेल्या प्रदेशात जमिनीचा कस झपाट्याने कमी होत होता. त्यामुळे हा विस्तार रोखण्यासाठी सहाराच्या काठाने आठ हजार किलोमीटर लांबीची वृक्षराजी उभारण्याची कल्पना 2002 साली मांडण्यात आली आणि 2005 मध्ये तिच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

वर्ल्ड बॅंकेकडून या प्रकल्पाला सुरुवात झाली 2007 पासून. त्यात एकूणवीस देशांनी भाग घेतला आहे. पश्‍चिमेच्या सेनेगलपासून मॉरितानिया, माले, नायजेरिया, चाड,करत करत सुदान, आणि पूर्वेला पार जिबुडीपर्यंत. भिंत म्हटली तरी प्रत्यक्षात हा एक मोठा लांबरुंद असा हरित पट्टा होणार आहे. या पट्ट्यात आतापर्यंत साडेपाच कोटी झाडं लावली गेले आहेत. त्यातली काही वाळून गेली तरी बरीच झाडं तगली आहेत, वाढत आहेत. त्या परिसरात जमिनीचा कस सुधारायला लागला आहे. नाहीसे झालेले प्राणी परत येऊन झुडुपांमध्ये वावरू लागले आहेत.

सोबत या निमित्ताने अनेक जणांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे आफ्रिकेतल्या वाढत्या लोकसंख्येच्या समस्येला तोंड देताना या परिसराचा हातभार लागू शकेल. रिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलं पुन्हा एकदा उभी करणे हे काम पटकन होऊन जाणारं नाही. त्याला बराच काळ लागतो, चिकाटी लागते. उन्हाचा तडाखा सहन न होऊन झाडं मरताना दिसली तरी धीर न सोडता वाचलेल्या झाडांना जगवायला मेहनत घ्यावी लागते. सेनेगलने या बाबतीत पुढाकार घेतलेला आहे, सोबत तिथे शेतीने पुन्हा एकदा जोम धरला आहे. इतर ठिकाणी अजून सुधारणेला वाव आहे. या द ग्रेट ग्रीन वॉल प्रकल्पाला संपूर्ण यश मिळायला आणखी बराच काळ वाट पाहायला लागेल. माणसाच्या हातून एकीकडे पर्यावरणाची दुर्दशा होत असताना दुसरीकडे तेच हात पर्यावरणासाठी विधायक कामंही करू शकतात याचं ही भिंत म्हणजे ठसठशीत उदाहरण आहे.म्हणूनच ही भिंत 2030 पर्यंत पुरी व्हावी ही आशा!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)