विज्ञानविश्‍व : चंद्राच्या न दिसणाऱ्या बाजूवर चीनचे यान…   

डॉ. मेघश्री दळवी 

नव्या वर्षाची सुरुवात झाल्यावर लगेच, म्हणजे 3 जानेवारीला चीनने आपलं यान चंद्रावर उतरवलं. यात विशेष बाब म्हणजे चंद्राची आपल्याला न दिसणारी जी दुसरी बाजू आहे, तिथे उतरणारं हे पहिलंच यान. म्हणूनच या मोहिमेला मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चंद्र जसा स्वत:च्या अक्षाभोवती फिरतो, तसा तो पृथ्वीभोवतीही परिभ्रमण करत असतो. स्वत:भोवती फिरण्याला त्याला सुमारे सत्तावीस दिवस लागतात. गंमत म्हणजे त्याला पृथ्वीभोवती फिरायलाही जवळजवळ तितकेच दिवस लागतात. म्हणजे त्याची एकच बाजू आपल्याला कायम दिसत असते. ही झाली चंद्राची दिसणारी बाजू, त्याचा सुमारे 59% पृष्ठभाग.
उरलेला 41% भाग आपल्याला कधीही दिसत नाही. म्हणूनच असावं बहुधा, या भागाबद्दल सगळ्यांना खूप कुतूहल असतं. शास्त्रज्ञांना आणि सर्वसामान्य लोकांनादेखील. काही जण मानतात की या भागावर एलियन्सची वस्ती आहे, तर काही जणांचा समज आहे की या भागात रशियाचा गुप्त लष्करी तळ आहे. तिथे अमेरिकेचा गुप्त तळ आहे हीही एक अशीच कवीकल्पना.

मात्र प्रत्यक्षात असं काही नाही. रशिया आणि अमेरिका दोन्ही देशांनी याआधी चंद्राच्या दुसर्य्‌ा बाजूची भरपूर छायाचित्रं घेतलेली आहेत, आणि ती माध्यमांमध्ये प्रसारित देखील केलेली आहेत. तिथे काही वेगळं नाही. ही दुसरी बाजू आपल्याला पृथ्वीवरून दिसत नसल्याने त्याला डार्क साइड ऑफ मून म्हटलं जातं, पण खरं तर तिथे व्यवस्थित सूर्यप्रकाश पोचतो. या भागाचे बाकी गुणधर्मही काही वेगळे नाहीत. फक्त तिथे विवरं जास्त आहेत. पण म्हणतात ना,जे दिसत नाही त्याचंच जास्त आकर्षण असतं.

चीनचं चांगं-4 हे यान 7 डिसेंबरला पृथ्वीवरून निघून 12 डिसेंबरला चंद्राजवळ पोचलं. तिथे काही काळ एक कक्षेत फिरत राहून मग ते 3 जानेवारीला चंद्रावर उतरलं. आता ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ असलेल्या वॉन कारमान विवराचं निरीक्षण करणार आहे. तसंच तिथल्या मातीचे नमुने गोळा करणार आहे. चंद्राच्या दुसर्यीा बाजूच्या नमुन्यांचा पहिल्यांदाच अभ्यास होणार आहे. त्यामुळे जगभरात एक प्रकारचा उत्साह दिसतो आहे.

चंद्राच्या या बाजूशी पृथ्वीवरून रेडिओ संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे चीनने हे यान सोडण्याआधी एक खास उपग्रह सोडून त्याच्यावरून रेडिओ संदेश परावर्तित होऊन चांगं-4 पर्यन्त पोहोचतील अशी व्यवस्था केली आहे.

चीनच्या या यशस्वी प्रयत्नानंतर साहजिकच प्रश्‍न उभा राहतो, की याआधी या बाजूचा अभ्यास का झालेला नाही? नासाने इथे कोणतंही यान का उतरवलेलं नाही?याचं एक साधं उत्तर म्हणजे इतर अवकाश मोहिमांकडे लक्ष देताना चंद्राची हे दुसरी बाजू कदाचित मागे पडली असेल. आताही चीनने या बाजूकडे मोहरा वळवल्याने यामागे काही राजकीय किंवा लष्करी हेतू असेल का ही शंका व्यक्त होते आहे. काहीही असलं, तरी चीनची ही मोहीम वा भारताच्या चांद्रयान मोहिमा यावरून एक गोष्ट निश्‍चित होते आहे-अवकाश आणि त्यातले ग्रहगोल हे कुणा एका देशाची मक्तेदारी नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)