विज्ञान व अध्यात्म

“जीवो जीवस्य जीवनंम्‌’ या उक्‍तीनुसार भगवंताने निर्माण केलेल्या या जगरहाटीचे चक्र सुरू होते. मग काही दुमताने म्हणतील, “भगवंत आहे, याला काही आधार?’ पाहा, जशी हवा आहे, पण ती दाखविता मात्र येत नाही. तिचे अस्तित्व जाणवते. वीज आहे, पण दिसत नाही. झटका मात्र बसतो. भगवंत म्हणजे अशी एक शक्‍ती आहे, जिच्यामुळे ही सृष्टी चालते. तो परमेश्‍वर सर्वत्र आहे, पण तो दाखवता येत नाही. सृष्टीचा विकास हा अज्ञानातूनच होत गेला. नंतर बुद्धिवतांना या विकासाच्या कल्पना सुचत गेल्या. अशी शक्‍ती निसर्गात विकास करत मानवी बुध्दीमध्ये विकास करत गेली व नवीन शोधांनी जन्म घेतला. विज्ञान संकल्पना रूढ होत गेली असावी. खर तरं अध्यात्म आणि विज्ञान एकच आहेत असे म्हणता येईल, कारण अध्यात्म हे निसर्गतःच अस्तित्वात आहे. हे एक परमेश्‍वरी रूपचं आहे. फक्‍त ते ज्ञात नव्हते. ते विज्ञानाने प्रकाशात आणले असे म्हणता येईल.

डोळे आहेत, पण डोळयातील पाहण्याची शक्‍ती म्हणजे परमेश्‍वरच. डोळयाची रचना-कार्य आपण विज्ञानात शिकतो; पण ही शक्‍ती निर्मिती झाली कशी हे अध्यात्म. कान आहेत पण कानातील ऐकण्याची शक्‍ती तो भगवंतच. अध्यात्मामुळे अस्तित्वात असलेल्या गोष्टीची जाणीव होते व विज्ञान फक्‍त सिध्द करते. पण म्हणून अध्यात्म विज्ञान ह्यात कोणी श्रेष्ठ व कनिष्ठ ठरत नाही, तर दोन्ही बरोबरीनेच चालतात म्हणून तर “त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि।” असे म्हणता येईल. कोणतेही कार्य सिध्दीस नेण्यासाठी धार्मिक अधिष्ठान हवे. तसेच विज्ञान सिध्दीसाठी अध्यात्माची गरज आहे. श्रीखंडाची वाटी, असे म्हणताना त्या वाटीतील श्रीखंड आपल्यासाठी अधिक प्रिय असते म्हणून ते ठेवलेली वाटी किंवा भांडे दुय्यम होत नाही. तसेच अध्यात्म-विज्ञान यांची सांगड घालता येईल. बैल जेव्हा तेलाच्या घाण्याभोवती फिरतो तेव्हाच तेल निघते म्हणून तेलाएवढेच बैलाला देखील महत्त्व द्यावेच लागेल ना! सृष्टीची निर्मिती हे एक परमेश्‍वरी स्वरूपच आहे. कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून तर या सृष्टीचे चक्र उप्तत्ती-स्थिती-लय या क्रमाने चालू आहे.

अगणित किडेमुग्यांचे पालन-पोषण कोण करतो? क्षुद्र कीटक, जीवजंतू सर्वांना तो खाऊ घालतो, सर्वांना सांभाळतो. याचाच अर्थ कर्ताकरविता तो आहे. जिथे ज्याचे अन्नोदक आहे तिथे तो जाणार कुणाच्या ना कुणाच्या नशिबाने त्याला मिळणारच. मी केले, माझ्यामुळे झाले ते खरे नव्हे.

नवनिर्मिती विज्ञानाला करता येत नाही. निर्मित वस्तूत बदल घडवून आणण्याचे काम विज्ञान करते. वाहत्या पाण्याला अडवून आपण त्याची साठवण करू शकतो. ते पाणी वापरू शकतो. पण या जलाचे रूप म्हणजे परमेश्‍वरी शक्‍तीच. ती या पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याने स्थित्यंतरे घडवते व सृष्टीचे चक्र चालू राहते. म्हणूनच ही नैसर्गिक आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अध्यात्म व विज्ञान याची योग्य सांगड घालता यायला हवी. परवाचाच उत्तराखंडाचा प्रलय बोलके उदाहरण म्हणता येईल.

ज्याने दिली आहे चोच, त्याने दिला आहे चारा
सांभाळून राहिलाय, साऱ्या विश्‍वाचा पसारा
असे द. ज. जोशी म्हणतात, ते खरेच आहे. आत्मोन्नतीसाठी या परमेश्‍वराची म्हणजे अध्यात्माची कास धरली तरच विज्ञानाला महत्त्व आहे. अध्यात्म म्हणजे केवळ पोथीपुरण नाही तर ती एक शक्‍ती आहे. जे विचार, बुध्दी, मन हया सर्व भावनांनी युक्‍त असा मानवी देह निर्माण करणारा सजीव निर्माण करू शकते. त्यांनी मांडलेले सिध्दांत बदलत नाहीत. सूर्य पूर्वीप्रमाणेच आजही पूर्वेलाच उगवतो व पश्‍चिमेला मावळतो. समुद्राला भरती-आहोटी कशामुळे येते? ह्या मागे जरी विज्ञान असले, तरी हे सिध्दांत शाश्‍वतच राहतात ते अध्यात्म. मग त्यात संशोधनानुसार बदल करते ते विज्ञान. हे विज्ञानाची शोधिका लावणारे शास्त्रज्ञ याची बुध्दी देखील परमेश्‍वरी चिंतनाचाच एक भाग आहे. ही शक्‍ती म्हणजेच अध्यात्म व त्यातूनच होणारी प्रगती म्हणजे विज्ञान. या दोन्ही संकल्पना तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. यामध्ये दुमत असू शकते तद्वत सर्व सृष्टीची निर्मिती करणारा परमेश्‍वर एक शक्‍ती, तर निर्मिर्तीतूनच नवीन शोध लावणारा वैज्ञानिक ही एकाच शक्‍तीची रूपे आहेत. असे म्हणता येईल. आत्मसुखासाठी सर्वांची सर्वाभूति तो सर्वेश्‍वर, हीच श्रध्दा असावी.

– सौ. मधुरा धायगुडे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)