डॉ. मेघश्री दळवी
आज आपण दिवसातला बराच वेळ इंटरनेटवर घालवतो. ऑफिसचे काम, स्वत:ची कामे, झालेच तर कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींना मेसेज करायला, खरेदी, गुंतवणूक, मनोरंजन सगळ्यासाठी इंटरनेट सोयीचे पडते यात शंकाच नाही. म्हणूनच गेली तीन वर्षे इंटरनेट मिनिटाची धमाकेदार आकडेवारी प्रसिद्ध होत असते.
काय काय होत असते इंटरनेटवरच्या एका मिनिटात? अठरा मिलियन म्हणजे 1.8 कोटी टेक्स्ट मेसेजेस या मिनिटात पाठवले जातात. त्याच्या दुपटीहून अधिक, चार कोटी व्हॉट्सऍप आणि मेसेंजरवरचे मेसेजेस आणि दसपट इमेल्स पाठवले जातात. यात खऱ्या खुऱ्या कामाचे किती आणि उगीचच पाठवलेले किती ही बाब अलाहिदा!
कोणत्याही कारणासाठी आपली बोटे चटकन गूगलकडे जात असतात. तेव्हा गूगलवर एका मिनिटात अडतीस लाख शोध होतात यात नवल नाही. मिनिटाला जवळजवळ चार लाख ऍप्स डाऊनलोड होतात. त्यातली किती ऍप्स लगेचच उडवली जातात हाही संशोधनाचा विषय होऊ शकतो. सर्वात लाडके ऍप फेसबुक असावे असे दिसतेय, कारण एका मिनिटात दहा लाख लोकं त्याच्यावर लॉग इन करतात. स्वत:च्या पोस्ट्स टाकायला आणि दुसऱ्यांच्या वाचायला. इन्स्टाग्रामवर त्याच वेळात साडेतीन लाख लोकं स्क्रोल करत असतात. हे प्रमाण 2018च्या दुप्पट आहे. यामागे बहुधा स्वस्त झालेली डेटापॅक्स असावीत. त्या तुलनेत एका मिनिटात ट्विटरवर असलेली लोकसंख्या कमी म्हणजे एक लाखाच्या आत आहे. हल्ली तक्रारींची ट्विट्स जास्त होतात म्हणून का?
मनोरंजनासाठी इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढलेला आहे. बघता बघता टीव्ही मागे पडून वेब-मनोरंजन पुढे आलेले आहे. एका इंटरनेट मिनिटात यूट्यूबवर 45 लाख व्हिडिओ पाहिले जातात, सोबत नेटफ्लिक्सवर सुमारे सात लाख तासांची कंटेंट पाहिली जाते. याचाच अर्थ, 4 कोटींहून जास्त माणसे नेटफ्लिक्सवर असतात. अशी आणखी कितीतरी व्हिडिओ स्ट्रीम करणारी ऍप्स अनेकजण वापरत असतील. सोबत संगीतस्ट्रीम करणारे आणि ऑनलाइन रेडियो ऐकणारे हिशेबात घ्या. ऑनलाइन लायब्ररी वापरून वाचन करणारे धरा. ऑनलाइन गेमिंग करणारे तर खूपच असतील. चॅटिंग आणि व्हिडिओ चॅटिंग भरपूर होत असणार. तर मग काम कोण करते हे नक्कीच पाहायला हवे! जगातील अनेकजण आपला वेळ असा “सत्कारणी’ लावत असताना खरेदीची आवड असणारेसुद्धा आपली हौस चांगलीच भागवताना दिसतात. एका इंटरनेट मिनिटात अंदाजे दहा लाख डॉलर्सची उलाढाल इकॉमर्स कंपन्यांनी नोंदवली आहे!
अलिकडे स्मार्ट स्पीकर किंवा व्हॉइस असिस्टंटचा वापर वाढत चालला आहे. या आकडेवारीत दर मिनिटाला 180 अमॅझोन एको पाठवले जाताना दिसतात. हे प्रमाण एका वर्षात तिप्पट झाले आहे आणि ते असेच वाढत गेले तर येत्या वर्षात जगातल्या किती जणांकडे अमॅझोन एको असतील? हा मामला गमतीजमतीचा आहे यात शंका नाही. तरी या वाढत्या वापराने नक्की काय साध्य होत आहे हा विचार एक मिनिट करायला हरकत नाही!