पालिकेच्या शाळांना मिळणार “गुरुजी’

यंदाच्या वर्षी विद्यार्थी अन्‌ तुकडीच्या संख्येत वाढ शिक्षकांना तासिका 85 रुपये मानधन

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागातील मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी मानधन तत्वावर 78 शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये, शैक्षणिक वर्ष 2019-20 या वर्षासाठी घड्याळी तासिका तत्वावर शिक्षकांची नियुक्‍ती केली जाणार असल्याचे, माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गेल्या वर्षी महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या 18 विद्यालयांमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी 50 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्या शिक्षकांची मुदत एक वर्षासाठी असल्याने ती एप्रिल महिन्यात संपली आहे. यामुळे, यंदाच्या वर्षासाठी माध्यमिक शिक्षक विभागाने नव्याने मानधन तत्वावर शिक्षकांची भरती काढली आहे. महापालिका शाळांमध्ये आठवी ते दहावीचे 8 हजार 112 विद्यार्थी शिक्षण घेतात.

माध्यमिक विभागात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने शाळेतील तुकडींच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या तुकडींच्या संख्येनुसार काही विषयांचे शिक्षक, सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती व रजा आदी कारणामुळे शिक्षकांची संख्या कमी झाली असून विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची आवश्‍यकता होती.

यंदा लवकर तरीही उशीरच गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शिक्षकांची भरती करण्यात आली होती. शाळा सुरु झाल्यानंतर चार महिन्यांनी शिक्षक भरल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मानधन तत्त्वावर शिक्षक भरतीचा निर्णय जरा लवकर घेण्यात आला आहे. असे असले तरी नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिना उलटून गेल्याने उशीरच झाला असे म्हणावे लागेल. गेल्या वर्षी उशीर झाल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर झाल्याचे दिसून आले. यामुळे, शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पाडण्याची आवश्‍यकता होती.

माध्यमिक विभागाच्या शाळेत 186 शिक्षक कार्यरत आहेत. सद्यस्थितीत शाळांमध्ये मानधन तत्वावरील शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यामुळे 78 शिक्षकांची नियुक्‍ती मानधन तत्वावर करण्यात येणार असून त्यासाठी मुलाखत 12 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. यामध्ये, 18 शिक्षक उर्दू शाळांना तर इतर 60 शिक्षक विषय शिक्षक, क्रीडा शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड माध्यमिक विभागात शिक्षकांची संख्या कमी असल्याने दरवर्षी मानधन तत्वावर शिक्षकांची नियुक्‍ती करण्यात येते. यामध्ये, शिक्षकांना घड्याळी तासिकेवर प्रत्येक तासाला 85 रुपये मानधन देण्यात येणार आहे. यामध्ये, प्रत्येक आठवड्याला सरासरी 28 तास होत असून महिन्याला साडेनऊ ते दहा हजार रुपये मानधन मिळू शकेल.

माध्यमिक विभागात विद्यार्थी संख्या वाढत असून त्या तुलनेत शिक्षकांची कमतरता जाणवत आहे. या विभागातून अनेक शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मानधन तत्वावर शिक्षकांची भरती केली जाणार आहे.

– पराग मुंढे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)