शालेय फुटबॉल स्पर्धा: हचिंग्ज, नगरवाला, व्हिन्सेंट उपान्त्यपूर्व फेरीत दाखल

सुब्रतो मुखर्जी शालेय फुटबॉल स्पर्धा

पुणे: हचिंग्ज स्कूल, नगरवाला डे स्कूल, सेंट व्हिन्सेंट व बिशप्स स्कूल कॅम्प या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना पुणे मनपा शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद आयोजित 17 वर्षांखालील मुलांच्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. तसेच दिल्ली पब्लिक स्कूल, एसएसपीएमएस, लॉयला हायस्कूल पाषाण व ऑर्बिस स्कूल या संघांनीही उपान्त्यपूर्व फेरीतील स्थान निश्‍चित केले.

-Ads-

पहिल्या सामन्यात सायन वर्गीसच्या एकमेव गोलच्या जोरावर हचिंग्जने सेंट जोसेफ, खडकी संघावर 1-0 अशी मात केली. तसेच अंश तलवारच्या गोलमुळे ऑर्बिसने आमी पब्लिक स्कूल रेसकोर्स संघाचा 1-0 असा पराभव केला. प्रभांश मथारू (6 व 26वे मि.) आणि इमॅन्युएल इजिकेल (14वे मि.) यांच्या कामगिरीमुळे लॉयलाने नगरवाला बोर्डिंग स्कूलचा 3-0 असा पराभव केला. तर ऍलन बिनॉयच्या (11 व 23वे मि.) दुहेरी कामगिरीमुळे दिल्ली पब्लिक स्कूल महंमदवाडी संघाने कलमाडी हायस्कूलवर 2-0 अशी मात करीत आगेकूच केली.

नगरवाला डे स्कूलने ऑर्किड स्कूलचे आव्हान टायब्रेकरमध्ये 5-4 असे मोडून काढले. सलील उत्तेकर, ओम साळुंखे, शबदसिंग पाल, मोहम्मद अली शेख व मंदार खोंड यांनी नगरवालाकडून गोल केले. तर ऑर्किडकडून अर्चित सिंग, ऋषिकेश काटे, निनाद वालंदे व प्रचित कुलकर्णी यांनी गोल केले. झैन शर्माचा लक्ष्यवेध चुकला. त्यामुळे ऑर्किड संघाला पराभव पत्करावा लागला.

अन्य सामन्यांत राल्फ रणदिवेच्या (5 व 27वे मि.) कामगिरीमुळे सेंट व्हिन्सेंटने विखे पाटील मेमोरियलवर 2-0 अशी मात केली. पवन ढोकरे, ईशान चितळे व शेनॉन परेरा यांनी बिशप्स स्कूल कॅम्पला गुरुकुल हायस्कूलवर 4-0 असा विजय मिळवून दिला. तर तन्मय शिंदे व अभिषेक खानेकर यांनी एसएसपीएमएसला सेंट जोसफवर 2-0 असा विजय मिळवून दिला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)