पिथोरगड (उत्तराखंड): मासिक पाळीच्या काळात शाळ्क़री विद्यार्थिनींचे शाळेत जाणे बंद होत असल्याचा प्रकार येथील राऊतगारा गावात होत असल्याचे आढळून आले आहे. गावातील विद्यार्थिनींना मासिक पाळीमुळे महिन्याला किमान 5 दिवस शाळा चुकवणे भाग पडत आहे. याचे कारण आहे शाळेच्या मार्गावर असलेले एक मंदिर.
शाळेच्या मार्गात चामू देवी या स्थानिक देवतेचे मंदिर आहे. मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रिया मंदिर असलेल्या रस्त्याने गेल्या तर मंदिर अपवित्र होते असा राऊतगारा गावातील स्थानिकांचा समज आहे. त्यामुळेच शाळकरी मुलींना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात पालकच शाळेत पाठवत नाहीत. अगदी कॉलेजात जात असलेल्या युवतींचीही त्यातून सुटका होत नाही. उत्तराखंड महिला मंच या एनजीओच्या सदस्यांनी राऊतगाराच्या दौरा केला तेव्हा ही गोष्ट उघडकीस आली. या रिवाजामुळे अनेक मुलींना शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जाऊन त्यांच्या नातेवाईकांकडे राहावे लागत आहे. तर अनेकींचे तर शिक्षणच बंद केले जात आहे. असे एनजीओच्या प्रमुख लीला भट्ट यांनी सांगितले.
शाळेतील शिक्षकवर्ग मुलींनी शाळेत यावे यासाठी प्रयत्न करत असतो, पण पालकांच्या अंधश्रद्धेमुळे त्यांना विरोध होतो. मात्र आता पालकांना समजावण्याचे काम शासकीय पातळीवरून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा