स्कूलबस नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी

पोलीस, परिवहन विभाग, महापालिका हद्दीतील सर्व शाळांच्या बैठकीत सूचना 

पुणे – स्कूलबस नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासह अन्य नियमांचे पालन करण्याविषयीच्या महत्त्वाच्या सूचना पोलीस, परिवहन विभाग आणि महापालिका शाळांतील मुख्याध्यापकांच्या संयुक्त बैठकीत शुक्रवारी देण्यात आल्या.

बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या सभेसाठी आठशे शाळांतील मुख्याध्यापक आणि शाळा प्रतिनिधी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधाकर ढमाले, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गणपत मोरे, महापालिकेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दीपक माळी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, क्रीडाप्रमुख, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षक आदी यावेळी उपस्थित होते.

शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या 20 जुलै रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार महापालिकेचे प्राथमिक शिक्षण विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस उपायुक्त कार्यालय, वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्कूल बस नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी तसेच विद्यार्थी वाहतूक सुरक्षितता आणि शालेय स्तरावर स्थापन होणाऱ्या शालेय परिवहन समितीबाबत महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमिक, प्राथमिक, अनुदानित आणि विना अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांची शुक्रवारी सभा आयोजित केली होती.

स्कूलबस नियमाच्या अंमलबजावणीबरोबरच सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांनी शालेय परिवहन समितीची स्थापना करणे, समितीच्या शालेय स्तरावर नियमित बैठका घेऊन नोंदी ठेवणे आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापन आणि बस सेवा देणाऱ्या कंत्राटदारांमध्ये आवश्‍यक सामंजस्य करार करणे आवश्‍यक आहे. अवैध वाहतुकीला आळा आणि मुख्याध्यापकांनी विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य द्यावे, याबाबत राऊत आणि ढमाले यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)