पालिकेच्या शाळांमध्येही मिळेना प्रवेश

जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांची अडवणूक  : पटसंख्या घसरत असतानाही टाळाटाळ

कामगारनगरीत असे निकष नकोत

पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगनगरी आणि कामगारनगरी म्हणून ओळखले जाते. येथे वास्तव्यास असणारे बहुतांश नागरीक हे नोकरी-व्यवसायासाठी बाहेरुन आलेले आहेत. येथे देशाच्या काना-कोपऱ्यातून लोक पोट भरण्यासाठी येत असतात. यामुळे किमान या शहरात शिक्षणासाठी तरी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील असे निकष असू नयेत, असे मत नागरिकांकडून व्यक्‍त केले जात आहे. याशिवाय स्थानिक नगरसेवकांच्या शिफारसींची एक अघोषित अटही पहायला मिळत आहे. शिक्षण मिळविणे हा प्रत्येक मुलाचा हक्‍क असल्याने तिथे राजकीय नेत्यांची पसंती-नापसंती पाहिली जाऊ नये, असेही मत व्यक्‍त केले जात आहे.

पिंपरी – केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे, म्हणून वेगवेगळ्या योजना राबवत आहे. दुसरीकडे महापालिकेच्या शाळांची पटसंख्या घसरत असतानाही पालिकांच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी अडवणूक करत आहेत. शाळा प्रशासन जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश देताना उडवा-उडवीची उत्तरे देवून प्रवेश देण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

खासगी शाळांमध्ये गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना प्रवेश मिळवणे जिकरीचे ठरते. गरीब मुलांनाही चांगले शिक्षण मिळावे, यासाठी महापालिकेने शहरात शाळा सुरू केल्या आहेत. आता मात्र महापालिकेच्या शाळांमध्येही प्रवेश मिळविणे सर्वसामान्य पालकांना अवघड होत चालले आहे. महापालिकेच्या शाळेत पटसंख्या घसरत असूनही शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देताना चालढकल केली जात आहे.

पालिकांच्या शाळांमध्येही प्रवेशासाठी खेटे मारावे लागत असल्याचा अनुभव पालिकेच्याच कर्मचाऱ्याला आला आहे. शहरातील केशवनगर माध्यमिक विभागाच्या शाळेत प्रवेशासाठी हणमंत गाडे यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पालकांना प्रवेशासाठी आठवडाभर खेटे मारायला लावूनही प्रवेश दिला नाही. गाडे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या आठ वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याच पुतण्यांना पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश नाकारला जात असल्याची घटना समोर आली आहे.

गाडे हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍यातील मालेगावचे रहिवासी असून ते गेल्या आठ वर्षापासून महापालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांची गावाकडील परिस्थिती हालाखीची असल्याने दोन पुतण्यांना शहरात आणून शिकविण्याचा निश्‍चय केला आहे. गाडे हे मुलांच्या नववीच्या प्रवेशासाठी केशवनगर शाळेत गेल्यानंतर त्यांना जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नसल्याचे सांगितले. त्यानंतर गाडे दोन दिवसानंतर शाळेत गेल्यानंतर प्रवेशाच्या जागा भरल्याचे सांगितले. यामुळे, वारंवार पाठपुरावा करुनही प्रवेश न मिळाल्याने गाडे यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. ज्या महापालिकेत आपण काम करतो त्यांच्याच शाळेत प्रवेश मिळत नसल्याने गाडे हताश झाले आहेत. यामुळे, महापालिकेच्या शाळांनी सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक न करत रीतसर प्रवेश देण्याची आवश्‍यकता आहे.

मला माझा पुतण्या व भाच्यांना शिकवून समाजातील चांगला घटक बनवायचा आहे. मी गेल्या पंधरा दिवसापासून वारंवार पाठपुरावा करुनही प्रवेशास टाळाटाळ केली जात आहे. शाळा प्रशासन जागा उपलब्ध नाहीत, जिल्ह्याबाहेरील मुलांना प्रवेश दिला जात नाही, स्थानिक नगरसेवकांच्या ओळखीच्या लोकांना प्रवेश द्यावा लागत असल्याची कारणे सांगत आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रवेश मिळणे आवश्‍यक आहे. 

हणमंत गाडे, पालक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)