नगर – तालुक्‍यातील निंबळक येथील दिव्यांग विद्यार्थी शिवाजी बाळासाहेब मंचरे जीवनज्योती मेडिकल फाउंडेशन कॉलेज, नगर-औरंगाबाद रोड या ठिकाणी शिक्षण घेत होता. त्या कालावधीत त्याने समाजकल्याण विभागाकडे कॉलेजमार्फत अपंग विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता.

त्यानंतर संबंधित कॉलेजला रुपये 22 हजार 100 चा चेक 28 जून 2017 रोजी पाठविला. तो चेक त्यांनी बॅंकेत वेळेत भरणा न केल्याने विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले. तथापि, या विद्यार्थ्याने पुन्हा पाठपुरावा करून आपल्या कार्यालयाकडून दुसरा चेक घेतला. दुसरा चेक 21 फेब्रुवारी 2018 रोजी या कॉलेजला जमा करून सुद्धा त्यांनी संबंधित विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिलेली नाही.

संस्थेचे प्राचार्य जाणीवपूर्वक या विद्यार्थ्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवत आहेत. तब्पल 1 वर्षे होऊन देखील या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळालेली नाही. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. हा विद्यार्थी वारंवार संबंधितांकडे जाऊनही केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तरी या प्रकरणात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालावे, या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी नगर तालुका पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार यांनी दिले आहे.

संबंधित कॉलेजला लाभार्थीच्या बॅंक खात्यावर शिष्यवृत्ती जमा झाल्याचा अहवाल व विद्यार्थी बॅंक खात्यासह उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीदेखील निवेदनात करण्यात आली आहे.
या कॉलेजने तत्काळ या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती प्रदान न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे डॉ. दिलीप पवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)