दखल: विखुरलेले विरोधक

अशोक सुतार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून सुरू केलेली भाजपची घोडदौड आता थांबल्याचे दिसत आहे. 2014 साली लोकसभा निवडणुकीत ज्याच्या त्याच्या तोंडी एकच नाव होते, ते म्हणजे नरेंद्र मोदी. या घटनेला पाच वर्षे झाली आहेत. एवढ्या काळात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. केंद्र सरकारने घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. नोटबंदी, जीएसटी, बॅंकेचे सातत्याने बदलणारे नियम, रेशन व्यवस्थेतील नकारात्मक बदल असे निर्णय सरकारसाठी हानिकारक ठरले आहेत. मोदी लाट केव्हा ओसरली हे मोदी व त्यांच्या चाणक्‍य मंडळालाही समजले नाही.

महाराष्ट्रात 2014 साली मोदी लाटेने भल्या भल्या पक्षांना गारद केले, सर्वच ठिकाणी तशी परिस्थिती होती. मोदी काहीतरी देशात सकारात्मक बदल करतील, अशी अपेक्षा जनतेला होती; पण ती फोल ठरली. शेतकऱ्यांचे कधी नव्हे ते अनेक राज्यांत आंदोलने व संप झाले. शेतकऱ्यांना विरोधी पक्षांनी फूस लावली, असे बनावट कारण सत्ताधाऱ्यांनी दिले. पण त्यावर चिंतन, मनन करावेसे कुणाला वाटले नाही. केंद्र सरकारमध्ये मोदी एके मोदी हे सूत्र जाणीवपूर्वक राबवले गेलेयं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तसे नियोजनच केले आहे. भाजपच्या खासदाराला पंतप्रधान मोदींची भेट घ्यायची असेल तर ती सहजासहजी मिळत नाही; कधी कधी ती मिळतही नाही. पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी अडगळीत पडले आहेत. पक्षात एकेकाळी ज्यांच्या नावाचा दबदबा होता, ते आता शांतपणे पक्षातील लोकशाहीची कुचेष्टा पाहात आहेत. आडवाणी, मुरली मनोहर जोशी आता उरले फक्‍त मार्गदर्शक म्हणून, तेही बॅनरवर.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज क्वचितच परदेश दौऱ्यावर जातात. पण मोदींनी आतापर्यंतच्या पंतप्रधानांचे परदेश दौऱ्यांबाबत रेकॉर्ड मोडले असण्याची शक्‍यता आहे. बरेच देश फिरून झाले, मोदी देशाकडे लक्ष देतील, अशी जनतेची अपेक्षा होती. परदेश दौरे कशासाठी करायचे, याचेही काही नियम असावेत. एखाद्या देशाशी चांगले संबंध किंवा नवीन करार करायचा असेल किंवा पंतप्रधानांनी स्वतःहून जाणे अगदीच अत्यावश्‍यक असेल तर प्रदेश दौऱ्याचे नियोजन होऊ शकते. इतर देशांशी धोरणावर प्रथम परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा करायची असते; पण इथे खुद्द पंतप्रधान प्रदेश दौऱ्यात अग्रभागी असतात. त्यामुळे परराष्ट्रमंत्री कशासाठी, असा प्रश्‍न जनतेला पडू शकतो. राजकारणात कोणतीही परिस्थिती कायम नसते, त्यात दरवेळी बदल होत असतात.

भाजपमधील ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा व शत्रुघ्न सिन्हा हे सध्या नावापुरतेच भाजपमध्ये आहेत, पण त्यांनी पक्षाशी बंड केले आहे. शत्रुघ्न सिन्हा हे दोन वर्षांपासून भाजपच्या धोरणाला विरोध करीत आहेत. यशवंत सिन्हांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडत सरकारविरोधात महाराष्ट्रात व अन्य राज्यांत रान उठवले आहे. पक्षातील जुनी जाणती मंडळी मोदी-शहा यांच्या धोरणाला कंटाळली आहेत, नाराज आहेत. भाजपने नुकताच सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत देशातील 100 जागा येत्या निवडणुकीत कमी होतील, असा अंदाज वर्तवला गेला आहे. हा सर्व्हे बाहेर फुटल्यामुळे भाजपची गोची झाली आहे. राज्यात या वेळेला भाजपचे संख्याबळ पूर्वीसारखे राहणार नाही, असाही अंदाज आहे. राजकारणात हा सर्व्हे बरोबर येईल, याचा अंदाज करणे कठीण काम आहे. परंतु जनतेमध्ये विद्यमान सरकारबद्दल नाराजी आहे, हे सांगण्यासाठी सर्व्हेची गरज नाही. राजकीय पक्षांनी आपल्याला लोकांनी भरभरून मते देण्याची अपेक्षा करणे चुकीचे नाही; परंतु असे होण्यासाठी पक्षांनी प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आहे.

मोदी सरकारवर गेल्या दोन वर्षांत विविध आरोप होऊ लागले आहेत. सध्या राफेलचा विषय कॉंग्रेसने ताणून धरल्यामुळे भाजप नेते मौनात आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात कॉंग्रेसच्या नेतृत्वात बदल होऊन राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. गुजरातमधील निवडणुकीत त्यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला होता. तिथे भाजपचीच सत्ता आली, पण भाजप नेत्यांची मोठी दमछाक झाली. त्यानंतर कर्नाटकात राहुल गांधींच्या नेतृत्वाने सत्ताबदल घडवत कॉंग्रेसचे सरकार आणले. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या राज्यांत भाजपला हार पत्करावी लागली. कॉंग्रेसने तीन राज्यांत सत्ता प्राप्त केली. आतापर्यंत झालेला हा बदल आहे.

राहुल गांधी यांना सुरुवातीला भाजपने “पप्पू’ म्हणून संबोधले, पण आज स्थिती अशी आहे की, राहुल गांधींनी मोदी सरकारची झोप उडवली आहे. राजकारणात कोण, केव्हा वरचढ होईल, ते सांगता येत नाही. मोदी सरकारविरोधातील जनतेच्या असंतोषाचा राजकीय फायदा घेणे, हाच कार्यक्रम कॉंग्रेसने सुरू केला आहे. कॉंग्रेसने सर्व विरोधकांना महाआघाडीत येण्याचे आवाहन केले आहे; परंतु काही राजकीय पक्षांच्या स्वप्रेमामुळे अनेक पक्ष कॉंग्रेसशी फारकत घेत आहेत. मोदींना विरोध हा अजेंडा विरोधकांचा राहिला तर ते भाजपला टक्‍कर देऊ शकतात. अन्यथा विविध तुकड्यांमध्ये विरोधक विखुरले तर त्याचा पुरेपूर राजकीय फायदा सत्ताधारी भाजप घेऊ शकतो, हे वास्तव आहे.

2014 साली मोदी लाट प्रबळ होती, नंतर ती ओसरत चालली आहे. याचा राजकीय फायदा विरोधकांना घ्यायचा असेल तर प्रादेशिक पक्षांनी देशातील मोठा विरोधी पक्ष कॉंग्रेसच्या नेतृत्वात एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. मोदी लाट नसली तरी विरोधकांच्या बेकीचा राजकीय फायदा सत्ताधारी घेऊन पुन्हा सत्तेवर येऊ शकतात. त्यामुळे विरोधकांनी वेळीच सक्रिय होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)