पुणे पालिका रुग्णालयात रेबीज लसींचा तुटवडा

स्थानिक खरेदीने लसी उपलब्ध करून देण्याची वेळ

पुणे – महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये श्‍वानदंशाच्या रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने रुग्णालयांमध्ये रेबीजच्या लसिंचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक दरपत्रक मागवून रुग्णालयाच्या अधिकारात प्रत्येकी 3 लाख रुपयांच्या लसी खरेदी करण्यात आल्या असून रुग्णांची गैरसोय टाळली जात आहे. दरम्यान, हे श्‍वानदंशाचे सर्व रुग्ण महापालिका हद्दीबाहेरून मोठ्या प्रमाणात पालिका रुग्णालयात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तसेच शासनाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या रेबीजच्या लसचा तुटवडा असल्याने शासनाकडून महापालिका हद्दीजवळील गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरविल्या जाणाऱ्या रेबीजच्या लस उपलब्ध नाहीत. परिणामी गेल्या महिन्याभरात महापालिकेच्या शहरातील रुग्णालयात श्‍वानदंशाचे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. त्याचत, महापालिकेकडूनही ही रेबीजची लस घेण्यासाठी मार्च महिन्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, या निविदा सुमारे 167 टक्‍के जादा दराने आल्यामुळे प्रशासनाने पाचवेळा मुदतवाढ दिली. मात्र, खुल्या बाजारातच लसिंचा तुडवडा असल्याने एकच विक्रेता पाचही वेळेस आला. त्यामुळे ही लस खरेदी झालेली नाही. अशा स्थितीत रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाने स्थानिक दर मागवून अत्यावश्‍यक बाब म्हणून रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातूनच ही लस खरेदी करत शहरातील रुग्णालयात आवश्‍यक असलेल्या लस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसेच पुढील दोन दिवसांत आचारसंहिता शिथील होण्याची शक्‍यता असल्याने अल्पमुदतीची निविदा मागवून तातडीने रेबीजच्या लसचा साठा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)