सोनगीरवाडीचे उद्यान जुगारी, मद्यपींचा अड्डा

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : बेसुमार वृक्षतोड, मुलांच्या खेळण्याचा प्रश्‍न ऐरणीवर

वाई – वाई नगरपालिकेच्या सोनगीरवाडीतील उद्यान समस्येच्या विळख्यात असून या उद्यानातील मुलांना खेळण्यासाठी ठेवण्यात आलेली खेळणी पूर्णपणे गंजलेली आहेत. त्याकडे मात्र पालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. पालिकेने या बागेत सुधारणेच्या नावाखाली जवळपास 25 वर्षे जुनी अशोकाची व गुलमोहराची नऊ झाडे गेल्या तीन वर्षांपूर्वी कुणाचीही परवानगी न घेता अवैधपणे तोडण्यात आली होती. वास्तविक पालिकेने जिल्हाधिकारी या प्रांताधिकारी यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. वृक्षतोडीचे पालिका प्रशासन समर्थन करीत असून सोनगीरवाडीतील उद्यानात सुधारणा करावयाच्या आहेत. म्हणून ही वृक्षतोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून जी बाग अवैध धंद्याची केंद्र बिंदू आहे.

अनेक तळीराम या ठिकाणी राजरोसपणे पीत बसलेले असतात. याकडे पालिकेचे कसलेही लक्ष नसून वृक्ष संवर्धनाचा कर वसूल करणारी पालिका बिंधास्तपणे अतिशय जुनी परंतु सुस्थितीत असलेली झाडे बेपर्वाईने तोडण्यात धन्यता मनात असेल तर वृक्ष तोडीचा वाईतील वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त करीत, या बेसुमार वृक्ष तोडीच्या विरोधात वाईतील कृष्णाई फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते व चालू असणारी वृक्षतोड त्वरित थांबविण्यात यावी, यासाठी पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल या संस्थेकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याचे पुढे काय झाले हे पालिका प्रशासनाच्या लक्षात सुध्दा ही बाब नाही.

पालिका प्रशासनाने बागेत सुधारणा करण्यासाठी झाडांची कत्तल करण्याची खरच गरज होती का? असा प्रश्‍न वाईकर नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. ज्या नाना-नाणी पार्कचे काम गेले कित्येक वर्ष झाले चालू असून त्या कामाला गती घेण्याचे पालिका प्रशासनाला आजतागायत जमले नाही. आणि जी झाडे चांगल्या स्थितीत आहेत त्यांची मात्र सुधारणेच्या नावाखाली राजरोसपणे कत्तल करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाच्या गलथान पणामुळे याआधी अनेक वेळ सत्ताधारी लोकप्रतिनिधी बदनाम झाले आहेत.

पालिकेची प्रशासन इमारत प्रशस्त असली तरी पालिकेचे काम मात्र अशोभनीय आहे. वाईकरांचा पालिकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन संशयास्पद असून पालिका प्रशासनावर नागरिकांमधून जाहीर टीका करण्यात येते. तरी पालिका प्रशासनाने याची गंभीर दाखल घेऊन सोनगीरवाडीतील उद्यात सुधारणा करण्यात येवून लहान मुलांना खेळण्यासाठी योग्य अशी दुरुस्ती करण्यात यावी, अशीही मागणी जोर धरत आहे.

पालिकेला खरच सोनगीरवाडीतील उद्यानात सुधारणा करावयाची असल्यास सर्वात प्रथम या उद्यानातील मद्यपींचा अड्डा बंद करण्यात येवून त्यांच्यावर कारवाई करावी, वाई शहरात दोनच उद्यान असून रामढोह आळीतील शिवाजी उद्यानावर सर्वच वाईकरांची भिस्त येऊन पडत आहे. त्यामुळे शिवाजी उद्यानात प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे, वास्तविक सोनगीरवाडीतील उद्यान कृष्णा नदीच्या काठावर असल्याने या उद्यानाकडे सर्वांचाच ओढा पाहायला मिळत असतो, परंतु गेल्या कित्येक वर्षात या उद्यानातील खेळणी पूर्णपणे खराब झाली असून खेळताना अपघात होवू शकतो त्यामुळे बाल गोपाळांचा हिरमोड होत आहे. तरी पालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता ही बाग दुरुस्त करावी व बालगोपाळांना खेळण्यायोग्य करावी अशी मागणी बालचमूतून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)